Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे | Delhi Murder Case Aftab Poonawala Polygraphy test reveals he had planned to kill Shraddha Walkar sgy 87 | Loksatta

Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे

खून करण्यासाठीच श्रद्धाला दिल्लीला आणलं होतं, आफताबचा खुलासा

Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे
खून करण्यासाठीच श्रद्धाला दिल्लीला आणलं होतं, आफताबचा खुलासा (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

श्रद्धा वालकरचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली आहे. यावेळी आफताबने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपण आधीपासूनच श्रद्धाच्या खूनाचा कट रचल्याची माहिती आफताबने दिली आहे. आफताबने दिलेल्या या कबुलीमुळे तपासाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण याआधी दिलेल्या कबुलीमध्ये आफताबने भांडण झाल्यामुळे नशेत श्रद्धाचा खून केल्याचा दावा केला होता.

खून करण्यासाठीच श्रद्धाला मुंबईतून दिल्लीला आणलं होतं असाही खुलासा आफताबने पॉलीग्राफी चाचणीत केला आहे. श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चात्ताप नसल्याचं आफताबने म्हटलं आहे.

पॉलीग्राफी चाचणीत आफताबला विचारण्यात आलेले प्रश्न…

१) तू श्रद्धाची हत्या केलीस का?
उत्तर – हो

२) १८ मे रोजी तू श्रद्धाची हत्या केलीस का?
उत्तर – हो

३) श्रद्धाच्या शरिराचे तुकडे जंगलात फेकले का?
उत्तर – हो

४) श्रद्धाच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला होता का?
उत्तर – हो

५) श्रद्धाची हत्या केल्याचा काही पश्चाताप आहे का?
उत्तर – नाही

६) हत्येसाठीच श्रद्धाला दिल्लीत आणलं होतं का?
उत्तर – हो

७) तू हत्या केल्याचं तुझ्या कुटुंबाला माहिती होतं का?
उत्तर – नाही

नेमकी घटना काय?

वसईतील २६ वर्षीय तरुणी श्रद्धाचा तिचा प्रियकर आफताबने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. आफताबने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रूर कृत्य उघडकीस आलं.

पोलीस आफताबपर्यंत कसे पोहोचले?

श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असून सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासूनच बंद असल्याचं आढळलं होतं. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावलं होतं. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली. पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 11:13 IST
Next Story
UP Accident: बहराइचमध्ये ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर