Delhi Murder Case : दिल्लीमधील कैलास हिल्स परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईलच्या चार्जरने तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल मीना (२३ वय) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
या घटनेच्या आधी याच आरोपीने आणखी एका दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे, म्हणजे २४ तासांत २ बलात्कार आणि एक १ खून अशी धक्कादायक माहिती या आरोपीबाबत समोर आली आहे. दिली पोलीस आता सर्वबाजूने कसून चौकशी करत आहेत.
दिल्लीमधील कैलास हिल्स परिसरात राहणाऱ्या एका आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात हा आरोपी आधी काम करायचा. मात्र, काही कारणांवरून त्याला काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा राग मनात धरून आरोपीने या अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेतील पीडित तरुणी ही आयआयटी पदवीधर असून ती यूपीएससीच्या परिक्षेची तयारी करत होती.
दिल्लीतील घटनेच्या दिवशी काय घडलं?
वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी ८ वाजता या पीडित तरुणीचे आई-वडील जीमवरून परत घरी आले. मात्र, घरात येताच त्यांना त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतर या प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांत दिल्ली पोलिसांनी बुधवारी २३ वर्षीय राहुल मीना याला अटक केली.
आरोपीने मुलीवर बलात्कार करून मोबाईल चार्जरने तिचा गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. मात्र, या गुन्ह्याचा तपास करत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने दिल्लीतील गुन्हा करण्याच्या काही तास आधी राजस्थानमधील अलवरमध्ये आणखी दुसऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आरोपी राहुल मीना हा दिल्लीच्या कैलास हिल्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आला. सकाळी ७.१५ वाजता तो घरातून बाहेर पडताना पुन्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. या घटनेबाबत सह पोलीस आयुक्त कुमार यांनी सांगितलं की, “आरोपीने घराच्या बाहेर पडण्यापूर्वी स्वत:चे कपडे बदलले. तसेच आणखी एका तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार आरोपी जवळपास ४० मिनिटं त्या घरात होता. या दरम्यान आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आणि तिचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो काही रोकड व मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला.
प्राथमिक चौकशीत काय आढळून आलं?
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं आढळून आलं की, बलात्कार-हत्या आणि घरातील चोरीच्या मागे त्याचा हेतू हा सूड घेण्याचा होता. कारण त्याला काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकलं होतं. त्यामुळे आरोपीला या आयआरएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाप्रती राग असू शकतो, त्यामुळे त्याने त्या सूडाच्या भावनेतून हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.
#WATCH | Indian Revenue Service (IRS) officer's daughter murder case in Delhi | Accused Rahul Meena brought to Amar Colony Police Station. pic.twitter.com/v4bBbHygNU
— ANI (@ANI) April 23, 2026
आरोपीला कामावरून का काढलं होतं?
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडितेच्या ५५ वर्षीय वडिलांनी याबाबत सांगितलं की, ‘संशयित त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास १० महिने कामाला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्याने शेजाऱ्यांकडून काही पैसे उसने घेतले होते आणि त्याच्या या सवयीमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.’
घराचं गेट बंद असतानाही आरोपी घरात कसा गेला?
दरम्यान, या आरोपीला त्या घराची संपूर्ण माहिती होती. घराचं गेट उघडण्यासाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्डबाबत आरोपीला कल्पना होती. कारण जेव्हा पीडित मुलीचे आई-वडील जीमसाठी जायचे, तेव्हा ते नोकरांसाठी एक स्मार्ट कार्ड घराबाहेर ठेवायचे. जेणेकरून कामगार आल्यानंतर त्यांची मुलगी झोपलेली असताना तिला त्रास होऊ नये, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र, या घटनेतील आरोपीला याबाबत माहिती असल्याने तो घरात प्रवेश करू शकला.

दिल्लीतील गुन्ह्याआधी आरोपीकडून आणखी एका महिलेवर बलात्कार
दिल्लीतील घटनेबाबत पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. दिल्लीतील गुन्हा करण्याच्या काही तास आधी आरोपी मीना याने राजस्थानमधील अलवरमध्ये आणखी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
अलवरच्या घटनेत काय घडलं?
अलवरच्या घटनेबाबत पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी जेव्हा दिल्ली पोलिसांचं एक पथक राजस्थानच्या अलवरला पोहोचलं, तेव्हा त्यांना समजलं की, मंगळवारी रात्री १० वाजता आरोपी मीना याने त्याच्या एका मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. त्या तक्रारीत त्या महिलेने आरोप केला की आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तिच्या म्हणण्यांनुसार, आरोपी तिच्या पतीचा मित्र आहे. तो मंगळवारी रात्री उशिरा तिच्या घरी आला. पण तेव्हा तिचा पती एका लग्नाला गेलेला होता. यावेळी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती अलवरच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
आरोपी राजस्थानमधून दिल्लीत कसा पोहोचला?
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनूसार, अलवरमधील घटनेनंतर आरोपी मीना हा लगेचच अलवर सोडून दिल्लीला रवाना झाला. यावेळी त्याने आपला एक फोन १० हजारांना विकला. त्यानंतर एक व्हॅन भाड्याने घेतली आणि तो दिल्लीला पोहोचला. यावेळी आरोपीने त्या चालकालाही पैसे न देताच निघून गेला. त्यानंतर सकाळी ६.३९ वाजेच्या सुमारास तो दिल्लीतील कैलास हिल्स परिसरात पोहोचला. त्यानंतर तो एका आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या घरी गेला आणि त्यांच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, अशी माहिती पोलीस सहआयुक्त (दक्षिण विभाग) विजय कुमार यांनी दिली.
शवविच्छेदन अहवालातून काय समोर आलं? : दिल्लीतील २२ वर्षीय तरुणीच्या हत्येच्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आणि त्यानंतर गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
