scorecardresearch

Delhi Murder: रोज सापडत होते मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी तपासले तब्बल ५०० फ्रीज; असा झाला दिल्लीच्या पांडव नगरमधील खूनाचा उलगडा

मृतदेहाचे १० तुकडे, ५०० घरं आणि एक फ्रीज

Delhi Murder: रोज सापडत होते मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी तपासले तब्बल ५०० फ्रीज; असा झाला दिल्लीच्या पांडव नगरमधील खूनाचा उलगडा
रोज मिळत होते मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी तपासले तब्बल ५०० फ्रीज

दिल्लीमध्ये अगदी श्रद्धा वालकर हत्याकांडाशी साम्य असणारी घटना घडली आहे. महिलेने आपल्या सावत्र मुलाच्या मदतीने पतीचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांनी मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली होती. पोलिसांना रामलीला मैदानातून वारंवार मृतदेहाचे तुकडे सापडत होते. पण हे तुकडे कुठून येत आहेत याबाबत त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आणि खूनाचा उलगडा झाला.

तब्बल पाच महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी खूनाचा उलगडा केला आहे. यासाठी दिल्ली पोलिसांनी रामलीला मैदानाजवळ असणाऱ्या घरांजवळ जाऊन सर्वांच्या फ्रीजची तपासणी केली. इतकंच नाही तर तुम्हाला काही दुर्गंध येत होता का? अशी विचारणाही केली.

काय आहे प्रकरण?

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने सोमवारी या खूनाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानात मिळणारे मृतदेहाचे तुकडे अंजन दास यांचे आहेत. ते बिहारचे रहिवासी होती. पत्नी पूनम आणि सावत्र मुलगा दीपक यांनी मिळून हा खून केला.

दिल्लीत महिलेकडून पतीची हत्या, मृतदेहाचे दहा तुकडे ‘फ्रीज’मध्ये; सावत्र मुलासह कृत्य, दोघांनाही अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, अंजन दासची दीपकची पत्नी आणि बहिणीवर वाईट नजर होती. यामुळे त्यांनी अंजन दासच्या खूनाचा कट रचला. त्यांनी आधी अंजन दासला गुंगीचं औषध दिलं. यानंतर त्याची गळा कापून हत्या केली. नंतर मृतदेहाचे १० तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले. श्रद्धा वालकर खूनातील आरोपी आफताबप्रमाणे त्यांनीही रोज रात्री घराबाहेर पडत मृतदेहाचे तुकडे फेकून दिले होते.

तुमच्या घऱात फ्रीज आहे का?

रामलीला मैदानात जे मृतदेहाचे तुकडे मिळत होते, त्यावरुन मृत व्यक्तीची ओळख पटत नव्हती. यामुळे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं. स्थानिकांच्या माहितीनुसार, पोलिसांना पांडव नगरमधील रामलीला मैदानात मृतदेहाचे तुकडे सापडले होते. यामुळे पोलिसांना रामलीला मैदानासमोर असणाऱ्या रहिवाशांपैकी कोणीतरी यात सहभागी असावं असा संशय आला. पोलिसांनी सर्व घऱांमध्ये जाऊन फ्रीजची तपासणी केली.

ब्लॉक २० मध्ये राहणारे सिकंदर सिंह यांनी सांगितलं की, पोलीस आम्हाला घऱी येऊन फ्रीज आहे का? अशी विचारणा करत होते. पोलीस आपल्या घरातही आले होते. तुमच्याकडे अजून एखादा फ्रीज आहे का? असंही ते विचारत होते अशी माहिती त्यांनी दिली. तसंच परिसरात कुठेही काहीतरी सडल्याचा दुर्गंध येत होता का? असंही विचारलं.

ब्लॉक २० मध्ये जवळपास ५०० घरं आहेत आणि या परिसरात असे अनेक ब्लॉक असल्याचं सिंग यांनी सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी हत्येचं रहस्य उलगडण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल याचा अंदाज येऊ शकतो असं ते म्हणाले आहेत.

श्रद्धा खून प्रकरणामुळे उलगडा

नोव्हेंबर महिन्यात पोलीस श्रद्धा खून प्रकरणाचा तपास करत होते. आफताबने आपण मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचं सांगितलं होतं. पोलिसांना जून महिन्यात रामलीला मैदानात मृतदेहाचे तुकडे सापडले होते. त्यामुळे याचा संबंध श्रद्धाशी असल्याचा संशय आला. पण तपासणी केली असता हे मृतदेहाचे तुकडे पुरुषाचे असल्याचं स्पष्ट झालं.

खूनाचा उलगडा कसा झाला?

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने हजारो सीसीटीव्ही तपासले होते. यावरुन त्यांनी अंजन दासची ओळख पटवली. अंजन दासबद्दल चौकशी करण्यात आली असता तो पाच ते सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं. यासंबंधी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. पोलिसांनी अंजन दासची पत्नी आणि मुलाकडे चौकशी केली. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

खूनाचं कारण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, पूनमचं अंजन दासशी हे तिसरं लग्न होतं. दुसऱ्या लग्नापासून तिला तीन मुलं होती. तर अंजन दासचं हे दुसरं लग्न होतं. अंजनची पहिली पत्नी आणि कुटुंब बिहारमध्ये राहतात. पहिल्या पत्नीपासून त्याला आठ मुलं आहेत. पूनमला अंजनची पत्नी आणि कुटुंबाबद्दल माहिती नव्हतं.

अंजन काही काम करत नसल्याने पूनमवरच कुटुंबाची जबाबदारी होती. यादरम्यान अंजन दासने पूनमचे दागिने विकून बिहारमधील आपल्या कुटुंबाला पैसे पाठवले होते. यावरुन दोघांमध्ये भांडणही होत होतं. यानंतर पूनमचा मुलगी दीपकचं लग्न झालं. अंजन दासची आपल्या पत्नी आणि बहिणीवर वाईट नजर असल्याचा दीपकला संशय होता. यावरुन पत्नी पूनमने दीपकसह मिळून अंजन दासची हत्या केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 11:48 IST

संबंधित बातम्या