Shocking revelations emerge in the Delhi Newlywed Murder case : देशात हुंडबळीची आणखी एक घटना घडली आहे. दिल्लीत एका २८ वर्षीय आकृती सुतार हिचा मृतदेह सापडला असून तिची हत्या झाली असल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. आता एक नवी माहिती समोर आली आहे. हत्येच्या आधी आकृतीने ऑफिसमधील सहकाऱ्यांसाठी पार्टीचंही आयोजन केलं होतं. न्यूज १८ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नवविवाहितेच्या आईने काय सांगितलं?
आकृती सुतार २४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकली. लग्नाच्या दोन महिन्यांतच तिचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी आत्महत्येची शक्यता फेटाळून लावत सांगितलं की, शनिवारी आकृती केवळ ऑफिसमध्येच गेली नव्हती तर तिने तिच्या सहकाऱ्यांसाठी एक छोटी पार्टीही आयोजित केली होती. हा नैराश्याचा (डिप्रेशन) संकेत असू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. याशिवाय, आकृतीने संध्याकाळी ६ च्या सुमारास तिच्या आईशी फोनवर संवाद साधला होता आणि त्या वेळी ती पूर्णपणे सामान्य वाटत होती. तिने पार्टीबद्दल सांगितलं आणि आपण घरी येण्यास निघाले असल्याचंही सांगितलं होतं.
आकृतीचे काका म्हणाले, दोन तासांनंतर म्हणजेच रात्री ८ च्या सुमारास कुटुंबाला तिच्या पतीचा फोन आला. त्याने आकृती बेपत्ता झाल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले, “त्यानंतर सुमारे ९० मिनिटांनी पोलिसांनी माहिती दिली की, पालिका कुंज येथे एका महिलेचा मृतदेह आढळला आहे.” छत्तरपूर येथील एका खाजगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारी आकृती, तिच्या पुष्प विहार येथील घरापासून सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या लोधी कॉलनीतील एका निवासी सोसायटीमध्ये मृत अवस्थेत आढळली. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास तिचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. ती इमारतीवरून खाली पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आकृतीचा २४ वर्षीय भाऊ अमेय सुतार याने दावा केला आहे की, ती मानसिकदृष्ट्या खूप खंबीर होती आणि ती कधीही स्वतःचा जीव घेऊ शकत नाही. कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, तिचा पती अरास्तू सिक्का आणि त्याचे नातेवाईक तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकत होते. लग्नानंतर अरास्तू आणि त्याचे कुटुंब २० लाख रुपयांची मागणी करत होते आणि आकृतीचा सातत्याने छळ करून तिला धमक्या देत होते, असा दावा कुटुंबाने केला आहे. अरास्तूने तिला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि तिच्या मृत्यूच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांच्यात तीव्र वाद झाला होता, असाही आरोप करण्यात आला आहे. ८ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर २४ एप्रिल रोजी दोघांचा विवाह झाला होता. तिचा पती बेरोजगार आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
