Arvind Kejriwal Sheesh Mahal controversy intensifies in Delhi Assembly with Parvesh Verma’s Rahman Dakait remark : दिल्ली विधानसभेत बुधवारी (२५ मार्च) रोजी जोरदार गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सरकारमधील मंत्री प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अदविंद केजरीवास यांच्या शासकीय निवासस्थानावर झालेल्या खर्चावरून गंभीर आरोप केले. त्यांनी सभागृगहात एक मोठी यादी सादर करत या ‘शीशमहल’ सारख्या घरात अत्यंत महागडे आणि लक्झरी सामान वापरण्यात आल्याचा आरोप केला.

इतकेच नाही तरी दिल्ली विधानसभेत बोलताना प्रवेश वर्मा यांनी आपल्या भाषणात आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुलना ‘रहमान डकैत’शी केली. दिल्लीतील ६, फ्लॅगस्टाफ रोड येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणासंदर्भातील कॅगच्या अहवालावर दिल्ली विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही टिप्पणी केली.

भाजपा नेते वर्मा यांनी ‘धुरंधर’ चित्रपटातील पात्राशी अरविंद केजरीवाल यांची तुलना करताना म्हणाले की, “हे अगदी ‘रहमान डकैत’च्या प्रसंगासारखेच होते. लोक अडचणीत असताना, जनतेचा पैसा लुटला जात होता.” पुढे बोलताना प्रवेश वर्मा म्हणाले, “देशात ‘धुरंधर’ नावाचा एक नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याची खूपच चर्चा होत आहे. त्यामधील ‘रहमान डकैत’ या एका पात्राचीही खूप चर्चा होत आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे डकैत होते, ज्यांनी दिल्लीच्या पैशांवर दरोडा टाकला. आता केजरीवालजी काहीही बोलले तरी, फक्त दिल्लीतीलच नाही तर देशातील प्रत्येक व्यक्ती म्हणतो की ते खोटेच असेल.”

भाजपाच्या नेत्याने यादीच वाचून दाखवली

प्रवेश वर्मा यांनी दावा केला की मुख्यमंत्री निवासस्थानी बसवण्यात आलेल्या जिमच्या उपकरणांपासून ते फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत महागडी आहे. ते म्हणाले की, एका ट्रेडमिलची किंमत सुमारे १४ लाख रुपये होती आणि त्यासाठी स्वतंत्र ट्रेनरलाही पैसे देण्यात आले. याव्यतिरिक्त, डंबेल सेटवर जवळपास ३ लाख रुपये खर्च करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, घरात ८८ इंचाचा मोठा टीव्ही बसवला गेला. तसेच तीन टीव्ही बसवण्यासाठी त्यावर एकूण २७ लाख रुपये खर्च झाले. याशिवाय चिमणी, सोफा, मिनी बार आणि एंट्रन्स लाइट सारख्या सोयी देखील बसवण्यात आल्या. प्रवेश वर्मा यांनी फर्निचरवर झालेल्या खर्चाबद्दल बोलताना सांगितले की, सोफा सेटचे दोन टेंडर काढले गेले, एक ३५ लाख रुपयांचे आणि दुसरे १,५ लाख रुपयांचे.

मंत्री पुढे म्हणाले की, त्यांच्या घरात ७६ टेबल लावण्यात आले, ज्यावर जवळपास १ कोटी पाच लाख रुपये खर्च झाले. याशिवाय ८ बेडवर ४० लाख रुपये खर्च करण्यात आला. तर खुर्च्यांवर ६० लाख रुपयेआणि कन्सोलवर ५० लाख रुपये खर्च केले गेले. त्यांनी सांगितले की घरात १.५ कोटी रुपयांचे पडदे बसवण्यात आले होते.

वर्मा यांनी दावा केला की याशिवाय घरात ६० लाख रुपयांचे कार्पेट आणि छोटे पफी (सोफ्याबरोबर ठेवण्यात येणारा छोटे स्टूल) देखील विकत घेण्यात आले. तसेच एक मोठा डायनिंग टेबल बसवण्यात आला, ज्यावर २८ लोक बसू शकतात, ज्याची किंमत १४ लाख रुपये आहे. याशिवाय जिममध्ये स्पिन बाइक १ लाख रुपयांची , फ्यूजन क्रेस्ट मशीन ३ लाख रुपयांची आणि बॉडी सॉलिड उपकरण ६ लाख रुपयांचे बसवण्यात आले.

त्यांनी पुढे सांगितले की, घरात जवळपास १२ लाख रुपयांचे इलेक्ट्रिकल आयटम आणि १४ लाख रुपयांचे सीलिंग डेकोरेटिव्ह फिटिंग्ज बसवण्यात आली होती. त्यांनी असाही दावा केला की घरात एकूण ११ टीव्ही होते, ज्यावर दीड कोटी रुपये खर्च झाले. तसेच बारबेक्यू यूनिट, सीलिंग स्पीकर, कॅमेरा, अॅम्प्लिफायर, प्री-एम्प्लिफायर सारखे महागडे उपकरण देखील होते.

भाजपाने दावा केला की घरात ५० एअर कंडिशनर लावण्यात आले होते आणि ५ लाख रुपयांचे इन्व्हर्टर सिस्टम देखील होते. प्रवेश वर्मा यांनी आरोप केला की या सर्व कामांचे टेंडर आणि एस्टिमेट एकाच दिवसात तयार करण्यात आले आणि त्याला मंजूरी देखील देण्यात आली. ते म्हणाले की दिल्लीच्या जनतेच्या पैशांवर मोठा डाका घालण्यात आला आहे.

आम आदमी आदमी पक्षाचे प्रत्युत्तर

आम आदमी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकला असून त्यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दिल्ली आपचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी भाजपाला निवडक गोष्टींना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री निवासस्थानाबद्दलची सर्व माहिती सार्वजनिक स्तरावर उपलब्ध आहे.

“जेव्हा केजरीवाल यांचे शासकिय निवासस्थानाचे नूतनीकरण केले जात होते तेव्हाच पंतप्रधानांचे निवासस्थान देखील बांधले जात होते. मुख्यमंत्री निवासस्थानाची सर्व माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे, पण पंतप्रधान निवासाची गुप्त ठेवण्यात आली आहे,” असे भारद्वाज म्हणाले. तसेच पक्ष निष्पक्ष आणि सर्वसमावेशक चर्चेसाठी तयार असल्याचेही ते पुढे बोलताना म्हणाले. तसेच भारद्वाज यांनी आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपा सरकारने ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमत असलेली व्हीव्हीआयपी बोट खरेदी करत असल्याकडे बोट दाखवले.

केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणाचा मुद्दा २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरला होता. या निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपाने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ‘शीशमहल’ या शब्दाचा पुरेपूर वापर केला होता.