निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. तसंच अनेक अशी प्रकरणं बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभं राहिलं होतं. ज्याची व्याप्ती दिल्लीत सर्वात मोठ्या प्रमाणावर होती. दरम्यान, दोषींच्या फाशीनं आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं व्यक्त केली होती. आणखी वाचा- निर्भया प्रकरण: जाणून घ्या ७ वर्षे ३ महिने ३ दिवसात नेमकं काय काय घडलं? काय आहे प्रकरण? दिल्लीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकूनही देण्यात आले. १६ डिसेंबर २०१२ ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र २९ डिसेंबर २०१२ ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. २०१३ च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने २०१४ मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. तर मे २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली. ट्रायल सुरु असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. एक आरोपी अल्पवयीन होता त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. आणखी वाचा- निर्भया प्रकरण: शेवटची इच्छा काय?; तुरुंग प्रशासनाच्या प्रश्नावर आरोपी म्हणाले… पवन जल्लादनं दिली फाशी निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद हे एक दिवस आधीच मेरठ वरून दिल्लीच्या तिहार तुरूंगात पोहोचले होते. त्यांनी सकाळी ठीक ५.३० वाजता या आरोपींना फाशी दिली.