Noida Salary Hike Protest News: पगार आणि पगारवाढ या सामान्य नोकरदार मंडळींसाठी मोठ्या जिव्हाळ्याच्या बाबी ठरतात. कारण याच बाबींशी नोकरदार वर्गाचं सगळं आर्थिक गणित अवलंबून असतं. त्यांची स्वप्नं अवलंबून असतात. या दोन बाबींमध्ये गडबड झाली, की त्यांचं सगळं नियोजन बिघडतं आणि त्यातून उद्भवणाऱ्या संतापाचा काही प्रसंगी उद्रेकदेखील होतो. असाच काहीसा प्रकार आज सकाळी राजधानी दिल्लीजवळ नोएडामध्ये घडल्याचं पाहायला मिळालं. पगारवाढीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांचा जमाव हिंसक झाला आणि थेट पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यापर्यंत या जमावाची मजल गेली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
दिल्ली एनसीआरमध्ये पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांची जाळपोळ!
दिल्ली एनसीआरमधील नोएडा परिसरात हा प्रकार घडला. नोएडा फेज २ मधील काही कंपन्यांमधले कर्मचारी आज सकाळीच रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापनाकडून सातत्याने फेटाळली जाणारी पगारवाढीची मागणी आणि व्यवस्थापनाची उडवाउडवीची उत्तरं यामुळे या कर्मचाऱ्यांनी अखेर रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मांडण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यातल्या काहींनी अचानक दगडफेक आणि सरकारी वाहनांचं नुकसान करण्याचा मार्ग पत्करला आणि सगळीकडे गोंधळ माजला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढीच्या मागण्यांसाठी हे कर्मचारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. आपापल्या कंपन्यांमधील व्यवस्थापनाविरोधात हे कर्मचारी घोषणाबाजीही करत होते. पण जेव्हा काही आंदोलकांनी थेट दगडफेक आणि वाहनांना आगी लावण्याचे प्रकार सुरू करताच आंदोलन चिघळलं. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओंमध्ये एका पोलीस वाहनाचीदेखील तोडफोड केल्याचं दिसून येत आहे.
पोलीस प्रशासनाचं नागरिकांना आवाहन
दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. या परिसरात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
शिवाय नोएडातील गौतम नगर परिसरात प्रामुख्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी यासंदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये व शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
“वरीष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर आहेत. पोलिसांची परिस्थितीवर करडी नजर आहे. कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन पोलिसांकडून सातत्याने केलं जात आहे. गरजेनुसार पोलीस बलाचा कमीत कमी वापर करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये”, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
