Old Rajender Nagar Incident : दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आता या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच या तळघरात परवानगीशिवाय लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशीदेखील माहिती आहे. नियमांचे उल्लंघन करत सुरु होती लायब्ररी द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, परवानगी नसतानाही या इमारतीच्या तळघरात लायब्ररी सुरु करण्यात आली होती. या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. महत्त्वाचे म्हणजे या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करत यासाठिकाणी बेकायदा लायब्ररी सुरु करण्यात आली होती. हेही वाचा - Delhi Coaching Incident: दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…” कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी आता कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १०६ (१), १५२, २९० आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या महापौरांनी दिले तळघर बंद करण्याचे निर्देश तत्पूर्वी दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी संबंधित इमारतीचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्लीत इतर ठिकाणीही अशाप्रकारे तळघरांचा वापर अन्य दुसऱ्या कामांसाठी होत असेल तर त्यांच्याविरोधातही कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शैली ओबेरॉय यांनी यासंदर्भात एमसीडी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. शनिवारी घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मी एमसीडी आयुक्तांना पत्र लिहिले असून एमसीडीच्या अखत्यारीत येणाऱ्या इमारतीच्या तळघरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कोचिंग सेंटर्सवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्या म्हणाल्या. हेही वाचा - “…तेव्हा त्यांनी मला तिचा चेहराही बघू दिला नाही”, मृतक विद्यार्थिनीच्या नातेवाईकाने… दिल्लीतील राजकीय वातावरणही तापलं दरम्यान, या घटनेनंतर दिल्लीतील राजकारणदेखील तापलं आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपाकडून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.