नवी दिल्ली : दिल्लीच्या पालम भागात बुधवारी सकाळी एका बहुमजली निवासी इमारतीला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध महिला आणि तिच्या तीन नातींचा समावेश आहे. त्यापैकी एकीचे वय केवळ तीन वर्षे होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघे इमारतीतून खाली उडी मारल्यामुळे जखमी झाले. दुर्घटनाग्रस्त इमारत पालम मेट्रो स्थानकाजवळील राम चौक बाजारपेठेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या इमारतीच्या तळघरात, तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर कपड्यांचे आणि प्रसाधन वस्तूंचे शोरूम होते.
इमारतीचे मालक राजेंदर कश्यप आपल्या कुटुंबासह दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांवर राहत होते. कुटुंबामध्ये राजेंदर कश्यप, त्यांची पत्नी, पाच मुले, एक मुलगी, चार सूना आणि सात नातवंडांचा समावेश होता. आग लागली तेव्हा कुटुंबातील अनेक व्यक्ती घरी नव्हत्या. राजेंदर कश्यप गोव्यात होते. तर त्यांचा एक मुलगा आणि त्याचे कुटुंब सहलीसाठी गेले होते.
मृतांमध्ये राजेंदर कश्यप यांची पत्नी लाडो, त्यांची मुले प्रवेश आणि कमल, कमलची पत्नी आशू आणि त्यांच्या तीन मुली या आगीत मृत्युमुखी पडले. मुलींचा वयोगट तीन, सहा आणि १५ असा आहे. त्याशिवाय लाडो यांची मुलगी हिमांशी आणि अन्य एक सून दीपिका यांचाही मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. राजेंदर यांचा मुलगा अनिल, त्याची दोन वर्षांची मुलगी आणि सचिन हे तिघे या आगीतून वाचले, पण तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शेजाऱ्यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, आग पहिल्या मजल्यावर लागली आणि लवकरच ती इतरत्र पसरली. पहिल्या मजल्यावर परफ्युम आणि इतर सौंदर्य प्रसाधने अशा ज्वालाग्राही वस्तू असल्यामुळे आग भडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ३० गाड्या आणि ११ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
आग विझवणे आणि बचावकार्यात पोलीस, बीएसईएस, हवाई दल पोलीस आणि एनडीआरएफच्या सदस्यही सहभागी झाले. सकाळी सव्वासहाच्या सुमाराला लागलेली आग विझवण्यात दुपारी २.२०च्या सुमाराला यश आले. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, सानुग्रह अनुदानाची घोषणा
दिल्ली आणि इंदूरमध्ये लागलेल्या आगींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टद्वारे मोदींनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच जखमींना लवकर बरे वाटावे अशी शुभेच्छा व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले.
