ईशान्य दिल्लीतील एका प्ले स्कूलमध्ये तीन वर्षांच्या मुलाला कथितरीत्या मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका सहाय्यकाला अटक केली असून, शिक्षिकेला नोटीस बजावली आहे. मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियनने दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी मुलाच्या पालकांना त्याच्या चेहऱ्यावर आणि हातांवर मारहाणीच्या खुणा दिसल्या. त्यानंतर दोन दिवसांनी मुलाला उलट्या होऊ लागल्याने पालकांनी त्याला कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे नेले. तपासणीत मुलाचे डोळे सुजलेले असल्याचे तसेच कानाच्या पडद्याला दुखापत झाल्याचे समोर आल्याचे वडिलांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक प्रकार?

पालकांनी विद्यालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला आरोप फेटाळण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. मात्र, नंतर त्यांना सीसीटीव्हीचे चित्रीकरण देण्यात आले.

पालकांच्या म्हणण्यानुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे पावणेसहा वाजता मुलाला खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते. तो सुमारे तीन तास बांधलेल्या अवस्थेत होता. त्याने स्वतःची सुटका केल्यानंतर परिचारकाने त्याला मारहाण केल्याचे चित्रीकरणात दिसल्याचा दावा वडिलांनी केला. तसेच, २९ ऑगस्ट रोजी शिक्षिकेने मुलाला थप्पड मारल्याचाही आरोप करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट रोजी उंची मोजण्याच्या नियमित प्रक्रियेदरम्यानही मुलाला विनाकारण थप्पड आणि ठोसे मारण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

‘तो अजूनही घाबरलेला आहे’

मुलाच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेनंतर मुलाच्या वर्तनात मोठा बदल झाला आहे. “तो इतका घाबरला आहे की स्वच्छतागृहात जाण्यासही घाबरतो. विद्यालयातून बाहेर काढल्यानंतर त्याने आंघोळही केलेली नाही. तो खोलीबाहेर पडण्यास नकार देतो,” असे त्यांनी सांगितले. मुलाच्या पालकांनी विद्यालय प्रशासनाला जाब विचारला असता, मुलाला अतिचंचल असल्याने त्याच्याशी असे वर्तन केल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.