मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईचे वृत्तांकन करणाऱ्या तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळ आणि विनयभंगाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात वाढता असंतोष पाहता, दिल्ली पोलिसांनी या घटनेच्या निष्पक्ष चौकशीची जबाबदारी क्राईम ब्रँचकडे सोपवली आहे.
आंदोलनाचे वृत्तांकन करताना गंभीर प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर आणि अशोका रोड परिसरात ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) आणि विरोधकांची निदर्शने सुरू होती. याचे वृत्तांकन करण्यासाठी अनेक स्वतंत्र आणि डिजिटल न्यूज पोर्टलच्या महिला पत्रकार घटनास्थळी उपस्थित होत्या.
एका महिला पत्रकाराने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आंदोलक महिलांना ताब्यात घेतले जात असताना तिथे एकही महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हती. पुरुष पोलीस अधिकारी महिलांना पकडत असल्याबद्दल तिने जाब विचारला असता, एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केले आणि धक्काबुक्की केली. तिने विरोध दर्शवताच तो अधिकारी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला.
तसेच दुसऱ्या एका पत्रकाराने दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी ३ वाजताच्या सुमारास ज्येष्ठ कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि वकील प्रशांत भूषण यांना ताब्यात घेतले जात असताना तिने कॅमेऱ्यात हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पुरुष पोलिसाने तिच्याशी अश्लील आणि लज्जास्पद वर्तन केले. तिने जाब विचारला असता, त्या पोलीस कर्मचाऱ्याने तिचे आरोप सरसकट फेटाळून लावले.
चौकशीचे आदेश अन् पोलिसांचा बंदोबस्त
या घटनेनंतर दिल्ली पोलीस प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. “नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे महिला पत्रकारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण तात्काळ क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित करण्यात आले आहे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार संघटना व स्वतंत्र पत्रकारांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत निदर्शने केली व लेखी तक्रारी सादर केल्या.
आंदोलनाची धग कायम, आज पुन्हा निदर्शने
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि महिला पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवण्याच्या मागणीसाठी आयसा आणि इतर सामाजिक संघटनांनी रविवारी (४ ऑक्टोबर) पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. याआधी ३ ऑक्टोबर रोजी आयसा अध्यक्ष नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह १५० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीट कडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले असून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
