पीटीआय, नवी दिल्ली
दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्याच्या आरोपावरून चार संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहार येथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली होती आणि सांकेतिक पद्धतीने ऑनलाइन माध्यमांद्वारे इतरांची भरती करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
गुप्तचर माहितीच्या आधारे विशेष पथकाने महाराष्ट्रातून दोघांना, तसेच ओडिशा आणि बिहारमधून प्रत्येकी एकाला अटक केली आहे. मोसैब अहमद (मूळ आझमगड-उत्तरप्रदेश, सध्या रा. ठाणे), मोहम्मद हम्माद (मुंबई), मोहम्मद सोहेल (कटिहार, बिहार) आणि शेख इम्रान (भुवनेश्वर-ओदिशा) अशी चौघांची नावे असून, त्यांच्याकडून आयईडी आणि इतर सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे. गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याच्या उद्देशाने, ‘आयईडी’ बसवलेली एक रिमोट-नियंत्रित खेळण्यातील कार बनवण्याच्या प्रक्रियेत दोघे होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
