Delhi Police arrest ISI terror module: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून भारतात शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सात जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’शी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या ईस्टर्न रेंज पथकाने ही कारवाई केली.
सात जणांचा अटक
अटक करण्यात आलेल्या सात जणांचा पाकिस्तानातील गँगस्टर ते दहशतवादी झालेल्या शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुजर यांच्या नेटवर्कशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पाकिस्तानातून मिळणाऱ्या सूचनांनुसारच ही टोळी काम करत होती अशीही माहिती समोर आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ले करणे, शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करणे आणि माहिती गोळा करण्याचे मुख्य काम ही टोळी करत होती. पाकिस्तानातून पंजाबच्या मार्गाने भारतात हेरॉईनसारखे अंमली पदार्थ आणि अत्याधुनिक शस्त्रे आणत होते, आणि नंतर ते दिल्ली-एनसीआरमध्ये पुरवले जात होते, असे तपासात उघड झाले आहे.
मुद्देमाल जप्त
अनस उर्फ अनस त्यागी (२६, रा. लोणी, गाझियाबाद), मोहित उर्फ योगी (२६, रा. लोणी, गाझियाबाद), दीपक उर्फ दीपक अग्रोला (रा. टेक्नो सिटी, गाझियाबाद), आरिफ उर्फ प्रधान (रा. लोणी), करणवीर सिंग (रा. फतेहगढ साहिब, पंजाब), जतन (रा. टेक्नो सिटी), साबिर (रा. लोणी, गाझियाबाद), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ५ अत्याधुनिक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, ४१ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल फोन, एक स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल आणि अनेक बँक खात्यांची माहिती हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोनमध्ये भट्टी आणि गुजर यांच्याशी संबंधित असलेले संशयास्पद चॅट्स आणि व्हॉईस नोट्स सापडल्या आहेत.
संभाव्य दहशतवादी हल्ला टळला
टोळीच्या अटकेतील सदस्यांनी दिल्ली-एनसीआरमधील अनेक महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती. याचे फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले जात होते. दरम्यान, पोलिसांनी वेळेत या प्रकरणाचा छडा लावल्याने राजधानी दिल्लीतील संभाव्य दहशतवादी हल्ले टळले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी शहजाद भट्टी आणि अजमल गुजर हे सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सचा वापर करून भारतीय तरुणांना शोधायचे. त्यांना पैशांचे आणि श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून टोळीत सामील करून घेतले जायचे, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या प्रकरणातील इतर फरार आरोपी, शस्त्रास्त्रे पुरवठा करणारे, ड्रग्ज नेटवर्क आणि पाकिस्तानातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत.
