नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये २० फेब्रुवारीला केलेल्या आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांनी मंगळवारी युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांच्यासह संघटनेच्या एकूण आठ सदस्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना मंगळवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चिब आणि इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १९१(१) (दंगल करणे), १९२ (दंगल भडकावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रक्षोभक कृत्ये करणे), कलम १९६ (भिन्न गटांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे), कलम १९७ (राष्ट्रीय ऐक्याला बाधा आणण्याचा प्रयत्न करणे) या कलमांअंतर्गत आणखी गुन्हा नोंदवले आहेत. भारत मंडपम येथे करण्यात आलेली निदर्शने बेकायदा असल्याचे पोलिसांनी बजावलेल्या अटक मेमोमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावेळी निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला केला, देशविरोधी घोषणा दिल्या, तसेच दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे मेमोमध्ये लिहिले आहे.

लोकशाहीची हत्या

चिब यांच्या अटकेवर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून ही देशात लोकशाहीची हत्या आहे, असे पक्षाने म्हटले आहे. तर, “यातून सरकारची हुकूमशाही प्रवृत्ती आणि भ्याडपणा दिसून येतो,” अशी टीका पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून केली. लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सत्येबद्दल अस्वस्थ करणारे सत्य समजले आहे, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान उतावीळ आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.

मला युवा काँग्रेसच्या शूर सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात देशाच्या हितसंबंधांशी तडजोड करण्यात आली आहे. या तडजोडीमुळे आपले शेतकरी आणि वस्त्रोद्योगाचे नुकसान होईल, तसेच आपला डेटा अमेरिकेकडे सोपवला जाईल. हे सत्य देशासमोर ठेवल्यामुळे उदय भानू चिब आणि इतरांना अटक करण्यात आली. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

निदर्शनांमध्ये लाजिरवाणे काहीही नाही!

जम्मू : उदय भानू चिब यांची आई रजनीबाला यांनी या अटकेचा निषेध केला आहे. ही अटक अन्याय्य आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे असे त्या म्हणाल्या. यातून सरकारची एकाधिकारशाही आणि अरेरावी दिसून येते अशी टीका त्यांनी केली. लोकांच्या हिताच्या मुद्द्यांवर संघर्ष करणे आणि देशाच्या युवकांसाठी लढा देणे हा गुन्हा नाही, असे त्या म्हणाल्या.