Delhi Police Arrest Man for Sending over 1000 Fake Bomb Threats: काही महिन्यांपासून शाळा, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी यंत्रणांना विविध माध्यमातून मिळत होत्या. यामुळे अनेक वेळा सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहून धमकी मिळालेल्या ठिकाणावर सुरक्षेचे उपाय राबवावे लागत होते. सदर धमक्या खोट्या असल्याचे नंतर निष्पन्न झाले. मात्र दिल्ली पोलिसांनी या धमक्यांच्या मागे असणाऱ्या सूत्रधाराला आता म्हैसूर येथून अटक केली आहे. देशभरात हजारहून अधिक ठिकाणी धमक्या देऊन दहशत पसरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव श्रीनिवास लुईस असे आहे. तो म्हैसूरच्या वृंदावन लेआऊट, सेकंड फेज, सिक्स्थ क्रॉस येथील एका घरात राहत होता. आरोपीने गेल्या काही काळात अनेक बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल पाठवले होते. लागोपाठ मिळणाऱ्या या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा आरोपीचा शोध घेत होत्या.
पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून वारंवार धमक्या मिळाल्यानंतर पोलिसांनी याबद्दल गंभीर विचार करत आरोपीला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांनी धमक्यांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर सदर ईमेल म्हैसूरहून पाठवले जात असल्याचे लक्षात आले. यानंतर दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने म्हैसूरमध्ये जाऊन ही कारवाई केली. म्हैसूरच्या व्ही व्ही पूरम पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिल्ली पोलिसांची या अभियानात मदत दिली.
लॅपटॉप आणि बोगस सीम कार्ड जप्त
पोलिसांनी आरोपी श्रीनिवासच्या घरावर धाड टाकल्यानंतर त्याच्याकडून अनेक सीम कार्ड आणि एक लॅपटॉप जप्त केला. प्राथमिक तपासानुसार या साहित्याच्या आधारे आरोपी बोगस ईमेल पाठवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आता या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.
मानसिक अस्वस्थ असल्याचा पोलिसांचा संशय
पोलिसांच्या मते, श्रीनिवास मानसिक आजाराचा सामना करत असावा. तो अविवाहित असून म्हैसूरमधील घरात आपल्या आईबरोबर राहतो. त्याच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे. मात्र सध्या तो बेरोजगार आहे. त्याची आई सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून तिच्या पेन्शनवर त्यांचे घर चालते.
