दिल्लीमध्ये मास्क न घातल्यामुळे एका सहाय्यक उपनिरीक्षकावर पोलीस उपायुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. मास्क न घातल्यामुळे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. चौथ्या बटालियनच्या एका सहाय्यक उपनिरीक्षकावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मास्क न घातल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्याने दिल्लीत पोलिसावर झालेली ही पहिलीच कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस उपायुक्त सत्यवीर कटारा हे करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होतंय की नाही हे पाहण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांनी ही कारवाई केली.

निलंबित केलेल्या सहाय्यक उपनिरीक्ष सुरेंद्र यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती कटारा यांनी दिली. 1 जून रोजी तात्काळ ही कारवाई करण्यात आल्याचं कटारा यांनी सांगितलं. “सरकारकडून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोर पालन केलं जावं अशी सूचना वारंवार दिली होती. 1 जून रोजी मी काही कार्यालयांना भेट दिली. त्यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक सुरेंद्र यांनी मास्क न घातल्याचं दिसलं. तसंच त्यांच्या कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही उल्लंघन केलं जात होतं. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली करण्यात आल्या होत्या.