नवी दिल्ली : पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा ‘इंटर स्व्हिहस इंजिलिजेन्स’ (आयएसआय) समर्थित आंतरराज्यीय दहशतवाद, शस्त्रास्त्रे आणि हेरगिरीचे जाळे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती अधिकार्यांनी शुक्रवारी दिली. या पथकाने पंजाब आणि राजस्थानमधील संवेदनशील लष्करी स्थळांच्या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावून एक गुप्त पाळत ठेवण्याचे जाळेही उघडकीस आणले आहे.

विशेष दोन कारवायांमध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याद्वारे प्रतिबंधित संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’शी संबंधित असलेल्या मोठ्या कटाचा खुलासा झाला आहे. हे जाळे हेरगिरी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि महत्त्वाच्या संरक्षण तळांची रेकी करण्याच्या कामात गुंतले होते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता.

तपासानुसार, आरोपींनी जिथे लष्कर आणि निमलष्करी दलांची मोठी हालचाल असते, अशा मोक्याच्या ठिकाणी किमान नऊ सौरऊर्जेवर चालणारे सिम-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या ठिकाणांमध्ये पंजाबमधील कपूरथला, जालंधर, पठाणकोट, पतियाळा आणि मोगा, तसेच हरियाणातील अंबाला, जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि राजस्थानमधील बिकानेर व अलवर यांचा समावेश होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद सिंह कुशवाह यांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे जाळे पाकिस्तानमधील हस्तकांच्या थेट सूचनेनुसार काम करत होते, जे ‘एनक्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म’द्वारे हेरगिरीच्या क्रियांचे समन्वय साधत होते. संरक्षण ठिकाणांची दृश्ये टिपणे, सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि सीमेपलीकडे महत्त्वाची माहिती पोहोचवणे ही जबाबदारी या आरोपींवर सोपवण्यात आली होती, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त कुशवाह म्हणाले.

सीसीटीव्ही कॅमेरे, पिस्तूल जप्त

विशेष पथकाच्या उत्तर विभागाच्या पथकाने केलेल्या पहिल्या कारवाईत पंजाब आणि दिल्लीतून सहा आरोपींना अटक करण्यात आली. तांत्रिक पाळत आणि मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी नऊ सीसीटीव्ही कॅमेरे आणि चार पिस्तूल जप्त केले आहेत.

लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नैऋर्त्य विभागाने राबवलेल्या दुसर्‍या मोहिमेत पंजाबमधील आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली. हे आरोपी टेहळणी मोहिमांमध्ये आणि लष्कर व ‘बीएसएफ’च्या आस्थापनांचे संवेदनशील दृश्ये सामायिक करण्यात सक्रियपणे सहभागी होते.