नवी दिल्ली : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास यांना त्यांच्या ‘टू इंडियाज’ या चित्रफितीसाठी मोठय़ा प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. दास यांच्या विरोधात मुंबई आणि दिल्ली येथे पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांनी आपल्या कवितेत भारताबद्दल जे काही म्हटले आहे, त्यामुळे समाजमाध्यमांपासून ते राजकीय जगतात त्यांचा विरोधात आणि पाठिंबा देण्याऱ्यांमध्ये वाद विवाद सुरू झाला आहे.

दिल्ली भाजपचे प्रवक्ते आदित्य झा आणि मुंबईतील वकील आशुतोष जे. दुबे यांनी दास यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दास यांनी देशाची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘अपमानकारक’ विधाने केली आहेत, असा झा यांनी आरोप केला आहे. तर दुबे यांनी त्यांना, ‘अमेरिकेमध्ये भारताची प्रतिमा बदनाम आणि खराब करण्यासाठी जबाबदार धरले आहे’. दास यांच्याविरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

‘देशाचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता असे वीर दास यांनी मंगळवारी आपल्या विधानांचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेस नेते शशी थरुर वीर दास यांचे समर्थन केले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये वीर दास याने केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी कपिल सिब्बल यांनी म्हटले की, येथे ‘दोन भारत’ आहेत, परंतु त्याबद्दल जगाला सांगावे असे लोकांना वाटत नाही. कारण ‘आम्ही असहिष्णू आणि दांभिक आहोत.’

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी वीर दास यांच्यावर टीका केली. देशाची चुकीची प्रतिमा मांडणे योग्य नाही, असे सिंघवी म्हणाले. 

प्रकरण काय?

सोमवारी वीर दास यांनी यूटय़ूबवर ‘आय कम फ्राम टू इंडिया’ नावाची चित्रफीत प्रसारित केली होती. सहा मिनिटांच्या चित्रफितीमध्ये दास यांनी देशाच्या कथित दुहेरी वर्तनाबद्दल भाष्य केले आहे. याशिवाय, करोना महासाथ, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवर केली जाणारी कारवाई यांसह, शेतकरी निदर्शने या मुद्दय़ांचा उल्लेख केला आहे. ‘मी तिथून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री दुष्कृत्य केले जाते.’ असे विधान त्यांनी या चित्रफितीत केले.