Delhi Police Constable Suspended BRICS Summit Reel: नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या ब्रिक्स परिषदेदरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलच्या दोन रील्स समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. कॉन्स्टेबल या रील्समध्ये स्नायपर रायफलसह इतर शस्त्र दाखवताना दिसत आहे. दीपक नावाच्या या पोलिसाविरोधात अतंर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

व्हिडीओ व्हायरल

कॉन्स्टेबल दीपकने हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका रीलमध्ये तो एका उंच इमारतीवर उभा असून स्नायपर रायफल हातात घेतल्याचे दिसत आहे. या रीलमध्ये गच्चीवरून आजूबाजूच्या इमारतीही स्पष्ट दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दीपक कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे आणि त्याच्याकडे पिस्तूल स्पष्टपणे दिसत आहे.

संवेदशनशील क्षेत्रातील व्हिडीओ

आणखी एका व्हिडीओत दीपक गच्चीवरून आजूबाजूचा परिसर दाखवत आहे, यात तिथे तैनात असलेले इतर सुरक्षा कर्मचारीही दिसत आहेत. ब्रिक्स परिषदेदरम्यान उच्च-सुरक्षा असलेल्या संवेदनशील सुरक्षा ठिकाण, तिथे तैनात असलेले कर्मचारी आणि शस्त्र दाखवल्यामुळे या व्हिडीओंवरून वाद निर्माण झाला.

ब्रिक्स परिषद

१२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम’ येथे २०२६ ची ब्रिक्स परिषद आयोजित केली होती. या परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ या संघटनेचा २०२४ मध्ये विस्तार झाला. यात इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा समावेश झाला. त्यानंतर २०२५ मध्ये इंडोनेशियाही यात सहभागी झाला.

अनेक देशांचा सहभाग

याशिवाय बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे देश गेल्या वर्षी ब्रिक्सचे भागीदार झाले. जगातील ११ प्रमुख उगवत्या अर्थव्यवस्थांना एकत्र आणणारी ‘ब्रिक्स’ ही एक प्रभावशाली संघटना बनली आहे. हे देश जागतिक लोकसंख्येच्या सुमारे ४९.५ टक्के, जागतिक जीडीपीच्या सुमारे ४० टक्के आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे २६ टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतात.