दिल्लीच्या पॉश न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरातील एका नाल्यात तरंगणाऱ्या एका ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या माणसाच्या कुजलेल्या शरीरावर टॅटूवरून पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह सात जणांना अटक केली आहे. १० ऑगस्ट रोजी पोलिसांना सुखदेव विहार येथील नाल्यात एका सूटकेसमध्ये तरंगत असल्याची माहिती मिळाली. ह्या बॅगमध्ये एक ३५ वर्षांच्या माणसाचा कुजलेला मृतदेह असल्याचं दिसून आलं. मृतदेहाच्या दुरावस्थेमुळे त्याची ओळख पटणं अवघड झालेलं असताना त्याच्या उजव्या हातावर ‘नवीन’ असं लिहिलेला टॅटू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

पोलीस उपायुक्त आर पी मीना यांनी एका निवेदनात म्हटलं आहे कि, या व्यक्तीची हत्या अन्यत्र करण्यात आली होती. त्यानंतर हा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला होता असं याबाबतच्या तपासातून समोर आलं आहे. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीची चौकशी आणि धक्कादायक खुलासे

तपासादरम्यान पोलिसांना दक्षिण दिल्लीच्या नेब सराय पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तीचा अहवाल सापडला. ज्यामध्ये नवीन नावाची व्यक्ती बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात त्या व्यक्तीची पत्नी मुस्कानने सांगितलं होतं की, तिचा पती ८ ऑगस्टपासून बेपत्ता आहे. अहवालात नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर पोलिसांना आढळलं की, मुस्कानने ११ ऑगस्ट रोजी घर सोडलं आहे. त्यानंतर पोलिसांनी तिचं मोबाईल लोकेशन शोधलं. त्यावेळी असं लक्षात आलं कि, ती खानपूर येथे तिच्या नवीन घरी आपली आई मीनू आणि २ वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. यावेळी विचारपूस केली असता ‘नवीन’च्या हातावर टॅटू असल्याचं मुस्कानने नाकारलं. परंतु, त्याच्या भावाने त्याच्या हातावर टॅटू असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानने सुरुवातीला सांगितलं होतं की तिचं आणि नवीनचं ७ ऑगस्ट रोजी भांडण झालं होतं आणि त्याने तिला मारल्यानंतर तिच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. तिने पोलीसांना त्यापुढे सांगितलं की, पुढे त्या रात्री तिने पीसीआर कॉल केला आणि वैद्यकीय तपासणीसाठी एम्समध्ये गेली. ती परत येईपर्यंत नवीन निघून गेला होती.

बेपत्ता झाल्यानंतर ५ दिवसांनी तक्रार का?

तिने सांगितलेल्या माहितीनुसार, तिने पीसीआर कॉल केल्याचं पोलिसांना आढळलं. परंतु, वैद्यकीय-कायदेशीर केस रेकॉर्ड सापडला नाही. त्याचप्रमाणे, तिने नवीन बेपत्ता झाल्यानंतर ५ दिवसांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार का दाखल केली? असा सवाल देखील पोलिसांनी मुस्कानला केला. तिच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता ती तिचा मित्र जमालच्या संपर्कात असल्याचं उघड झालं. जमालच्या फोन लोकेशन्सची माहिती मिळाल्यानंतर पुढील तपासात, तो ७ ऑगस्ट रोजी मुस्कानच्या घरी आणि दुसऱ्या दिवशी मृतदेह फेकलेल्या सुखदेव विहार येथे असल्याचं आढळून आलं.

अधिक चौकशी केल्यावर पोलिसांनी सांगितले, मुस्कानने कबूल केलं कि नवीनला 7 ऑगस्टच्या रात्री जमाल त्यांच्या घरी सापडला आणि त्यानंतर भांडण झाले. जोरदार वादविवाद ऐकून बाहेर उभे असलेले जमालचे मित्र विवेक आणि कोसलेंद्र खोलीत शिरले आणि तिघांनी नवीनला पकडलं. जमाल आणि विवेकने नवीनला खाली धरलं असताना, कोसलेंद्रने त्याच्या मानेवर अनेक वेळा वार केले.

त्यांनी बाथरुममध्ये मृतदेह धुतला आणि…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानने असंही सांगितलं कि बाथरुममध्ये मृतदेह धुतला होता आणि खोली स्वच्छ केली होती. नवीन, जमाल आणि इतरांचे रक्ताने माखलेले कपडे चिराग दिल्ली येथील नाल्यात फेकले गेले आणि मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून सुखदेव विहार नाल्यात फेकून देण्यात आला.”

मुस्कानला पहिल्यांदा अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील देवळी येथून विवेक, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद स्थानकातून जमाल आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून कोसलेंद्रला अटक केली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली ऑटो चालविणारा विवेकचा भाऊ विशाल आणि मृतदेह फेकण्यात कथितपणे सहभागी असणारा जमालचा मित्र राजपाल यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचसोबत, जमाल आणि इतरांना नवीनला मारण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मुस्कानच्या आईला देखील अटक करण्यात आली. कारण, ही हत्या झाली तेव्हा ती खोलीत होती असं पोलिसांना आढळून आलं आहे. त्याचसोबत, पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडे देखील जप्त केले आहेत.