Delhi Police Neha Bora Protest : जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान एक रंजक घटना घडली. या आंदोलनासाठी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा हिचा पोलिसांकडून शोध घेतला जात असताना, पोलिसांनी तिच्यासारख्याच दिसणाऱ्या एका दुसऱ्याच महिलेला ‘नेहा बोरा’ समजून ताब्यात घेतले. मात्र, इन्स्टाग्रामवर समोर आलेल्या एका ‘रील’मुळे हा सर्व गोंधळ दूर झाला आणि खरी नेहा बोरा इतरत्र असल्याचे स्पष्ट झाले. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
काय होता घटनाक्रम?
रविवारी दुपारी एकच्या सुमारास नेहा बोराने सोशल मीडियावर एक संदेश देत आरके आश्रम मेट्रो स्थानकाजवळ आंदोलनाची हाक दिली होती. “लक्षात ठेवा, वेळेवर पोहोचा,” असे आवाहन करत तिने दुपारी अडीच वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे आरके आश्रम परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी सव्वादोनच्या सुमारास कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आणि पोलिसांनी आंदोलकांना एकामागून एक ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
‘नेहा बोरा ताब्यात’
यादरम्यान, चार महिला पोलिसांनी एका महिलेला हात आणि खांदे धरून बसमध्ये नेण्यास सुरुवात केली. चेहऱ्यावर मास्क, गळ्यात लाल कापड आणि काळ्या गोलाकार फ्रेमचा चष्मा घातलेली ती महिला अगदी हुबेहूब नेहा बोरासारखीच दिसत होती. “नेहा बोराला ताब्यात घेतले,” अशी चर्चा सुरू होताच प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र, काही वेळातच ती महिला नेहा नसून तिची ‘ड्युप्लिकेट’ असल्याचे उघड झाले.
इन्स्टाग्रामवरील रीलने उलगडले कोडे
आरके आश्रम परिसरात ही कारवाई सुरू असतानाच, खुद्द नेहा बोराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक ‘रील’ झळकली. खरी नेहा आरके आश्रमजवळ नसून कनॉट प्लेस परिसरात ‘एआयएसए’च्या समर्थकांसोबत पोलिसांना गुंगारा देत धावत होती. ब्लू टोकाई कॅफेजवळ तिचा वेग मंदावल्यानंतर अखेर विजय चौकात पोलिसांना खऱ्याखुऱ्या नेहा बोराला ताब्यात घेण्यात यश मिळाले.
दोन्ही ठिकाणांहून ५० जणांना अटक
आरके आश्रम मेट्रो स्थानक आणि कनॉट प्लेस येथील या दोन्ही घटनांदरम्यान सुमारे ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना तेथून बसमध्ये बसवून अन्य ठिकाणी हलवण्यात आले. खुद्द नेहा बोराने आपल्या सोशल मीडियावर त्या हुबेहूब दिसणाऱ्या तरुणीसोबतचा फोटो शेअर करीत, ‘दोन नेहांची गोष्ट. कोणतीही रणनीती नाही केवळ योगायोग’, कॅप्शन दिली.
