राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांच्या फेशिअल रेकग्निशन सिस्टीमने (FRS) एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आणली आहे. आंदोलनाच्या गर्दीत पोलिसांच्या एआय (AI) सॉफ्टवेअरने २,८७३ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना टिपले होते. मात्र, या यादीची सखोल पडताळणी केली असता, त्यात ओळख पटलेले तब्बल २५ जण हत्येसारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यांसाठी आधीच तुरुंगात असल्याची नोंद समोर आली आहे.

यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी हत्येचा प्रयत्न, बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेले आणि तुरुंगात असलेल्या आरोपींचे धागेदोर तिथे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि पोलिसांचा दावा काय?

विद्यार्थ्यांच्या परीक्षा घोटाळ्याविरोधात जंतरमंतरवर झालेल्या या आंदोलनाबाबत दाखल झालेले सर्व एफआयआर (FIR) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. मात्र, २० ते २६ जुलै दरम्यान गर्दीत उपस्थित असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळलेल्या २,८७३ जणांवर कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी न्यायालयाने सरकारला दिली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. केवळ फेशिअल रेकग्निशन सॉफ्टवेअरने ओळख पटवली म्हणजे थेट कारवाई केली जाणार नाही, तर प्रत्यक्षात फील्ड व्हॅलिडेशन (प्रत्यक्ष पडताळणी) केल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तपासात काय समोर आले?

इंडियन एक्स्प्रेसने पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रातील गंभीर गुन्ह्यांशी संबंधित २०५ लोकांच्या नोंदींची सखोल तपासणी केली. यामध्ये १०१ हत्येचे आरोपी, ६१ बलात्काराचे आरोपी, ६ पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आरोपी आणि हत्येचा प्रयत्न करणारे ३७ आरोपी समाविष्ट होते.

पोलीस, न्यायालय आणि तुरुंगाच्या अधिकृत नोंदींची पडताळणी केली असता खालील महत्त्वाचे मुद्दे समोर आले:

  • २५ जण गंभीर गुन्ह्यांत तुरुंगात: या २०५ गंभीर गुन्हेगारांपैकी २५ जण FRS सॉफ्टवेअरने जंतरमंतरवर ‘ट्रेस’ केले तेव्हा ते हत्येसह इतर गंभीर गुन्ह्यांमुळे तिहार, मंडावली आणि रोहिणी या दिल्लीतील तीन मुख्य तुरुंगांत बंद असल्याचे किंवा त्यांच्यावर खटले सुरू असल्याचे नोंदींवरून स्पष्ट झाले.
  • गंभीर गुन्ह्यांचे स्वरूप: या २५ जणांमध्ये हत्येचे १७, बलात्काराचे ४ (ज्यात २ पॉक्सो प्रकरणातील आहेत) आणि हत्येच्या प्रयत्नाचे ४ आरोपी समाविष्ट आहेत.
  • तारखांचा तपशील: एफआरएसने २४ जुलै रोजी ३ जणांना, २५ जुलै रोजी २१ जणांना आणि २६ जुलै रोजी १ आरोपीला जंतरमंतरवरील आंदोलनात टिपल्याची नोंद आहे.

पोलिसांची भूमिका काय?

या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “आंदोलनादरम्यान प्राथमिक दृष्ट्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २,८७३ व्यक्तींची ओळख पटली होती. मात्र, या सर्वांची प्रत्यक्ष पडताळणी अद्याप प्रलंबित आहे.”

१७ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दिल्ली पोलिसांच्या ‘क्राईम कुंडली’ (Crime Kundli) बायोमेट्रिक डेटाबेसमधून २,४०२ आणि इतर गुन्हेगारी नोंदींमधून ४७१ जणांचे चेहरे मॅच झाले होते.