देशद्रोहाच्या खटल्याला सामोरे जाताना घेतलेल्या आक्रमक वैचारिक पवित्र्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांनी विद्यापीठ अधिकाऱ्यांना शनिवारी दिले.

कन्हैया कुमार याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त  प्रेमनाथ यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी पत्र पाठविले आहे. विद्यापीठाच्या परिसरातील वसंत कुंज (उत्तर) पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कन्हैया कुमारच्या हालचालींची माहिती द्यावी, असे या पत्रात फर्माविले आहे. त्याच्या विद्यापीठाबाहेरील हालचाली व प्रवासाची ठिकाणे याचीही माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

कन्हैया कुमार याच्यावर पतियाळा हाऊस न्यायालयात १७ फेब्रुवारीला हल्ला झाला होता. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेच्या काळजीतूनच हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुठल्याही विद्यार्थी नेत्याला धक्काही लागू नये, अशी व्यवस्था केली आहे. जामिनावर सशर्त मुक्तता केल्यानंतर कन्हैयाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. तो विद्यापीठात सुरक्षित पोहोचावा यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले.

भाजयुमो नेत्याची हकालपट्टी : कन्हैयाकुमार याची जीभ छाटणाऱ्यास पाच लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा करणारा भाजयुमोचा नेता कुलदीप वर्षणय याची शनिवारी पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.