दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात स्पर्धा परीक्षेची (UPSC) तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीला दिल्ली पोलीसांकडून त्रास दिला गेल्याचा आणि तिच्यावर पाळत ठेवली गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) च्या जंतर-मंतर येथील आंदोलनात सहभागी असल्याचा संशय घेत पोलीसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी डाव्या आघाडीच्या नेत्या वृंदा करात यांनी दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोल्चा यांना पत्र लिहून दोषी पोलीसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे वृत्त ‘द प्रिंट’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
जिममध्येच पोलिसांनी घातला गराडा
आहाना सिंग कैथ ही दिल्ली विद्यापीठाची पदव्युत्तर पदवीची विद्यार्थिनी असून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ५ जून रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ती राजेंद्र नगर येथील जिममध्ये गेली असता, तिथे ४ ते ५ पोलिसांनी तिला घेरले. पोलिसांनी तिला एका इमारतीच्या तळघरात नेऊन ‘तू ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची कार्यकर्ती आहेस का? तुमचा उद्याचा प्लॅन काय आहे? तुमचे राजकीय विचार काय आहेत?’ अशा प्रश्नांचा भडीमार करत तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहानाने केला आहे.
जबरदस्तीने तपासला फोन आणि मागितले ‘लाईव्ह लोकेशन’
आहानाने आपला या ‘कॉक्रोच जनता पार्टी’शी संबंध नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र, पोलिसांनी तिच्यावर संशय कायम ठेवला. वॉरंट नसतानाही पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले. इतकेच नव्हे, तर तिला तिचे ‘लाईव्ह लोकेशन’ पोलिसांना शेअर करण्यास भाग पाडले आणि तिच्या घराजवळ एक पोलीस अधिकारी तैनात केला. जेव्हा मोबाईलमधील लाईव्ह लोकेशन आपोआप बंद झाले, तेव्हा पोलीस उपनिरीक्षकाने थेट तिच्या घराची बेल वाजवून तिला त्रास दिल्याचेही आहानाने सांगितले.
जुन्या आंदोलनांचा ठरला संदर्भ?
आहाना पूर्वी ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SFI) ची कार्यकर्ती होती. जुलै २०२४ मध्ये राजेंद्र नगर येथील एका कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी भरून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, त्या आंदोलनात तिने भाग घेतला होता. तसेच गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या एसएससी (SSC) आंदोलनातही ती सक्रिय होती. मात्र, गेल्या एका वर्षापासून ती कोणत्याही आंदोलनात नसून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे. जुन्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तिला लक्ष्य केल्याचा तिचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर मध्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) रोहित राजबीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या भागात यापूर्वी अनेक आंदोलने झाली आहेत. त्यामुळे पुन्हा तसे काही आंदोलन होणार आहे का आणि त्याची तीव्रता किती असेल, याचा अंदाज घेण्यासाठी पोलीस माहिती गोळा करत होते,” असे त्यांनी सांगितले. तसेच, या विद्यार्थिनीकडून अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यास, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
