नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाच्या चित्रफितीमध्ये दिशाभूल करण्यासाठी फेरफार केल्याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह पाच जणांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी नोटीस बजावली. केंद्रीय गृहमंत्रालय व भाजपने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर रेड्डी यांनी सडकून टीका केली आहे.

अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडणारीप्रचारसभेतील फेरफार केलेली शहा यांची चित्रफीत काँग्रेसच्या नेत्यांनी समाजमाध्यमांवरून प्रसारित केली. तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ हॅण्डलवरही ही चित्रफीत अपलोड केली असल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्रालय व भाजपने दिल्ली पोलिसांकडे केली आहे. चित्रफीत दिशाभूल करणारी असून त्यामुळे समाजातील तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. फेरफार करण्यात आलेली ही चित्रफीत जुनी असून मूळ चित्रफितीमध्ये शहा यांनी धर्माच्या आधारावर कर्नाटकमध्ये मुस्लिमांना दिलेले ४ टक्के आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा मांडला होता. धर्माच्या आधारावर आरक्षण लागू करता येत नाही. कर्नाटकमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण संविधानविरोधी असल्याचे शहांचे म्हणणे होते. मात्र, फेरफार केलेल्या चित्रफितीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत शहा हे अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींचे आरक्षण रद्द केले जाईल असे सांगत असल्याचा गैरसमज निर्माण होतो.

हेही वाचा >>>राजीनामा दिल्यानंतर दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, “पक्षातील काही समस्या…”

ही बनावट चित्रफीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ‘एक्स’वरून पुन्हा प्रसारित केल्यानंतर या प्रकरणातील संशयितांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रारीची दखल घेत रेड्डी यांना १ मे रोजी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले असून त्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूही बरोबर आणण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांनी ‘एक्स’ व ‘फेसबुक’ला माहिती-विदा पुरवण्यासही सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘पोलिसांच्या नोटिसीला कोणीही घाबरत नाही. असल्या क्लृप्त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. लोकसभा निवडणुकीत विशेषत: तेलंगण व कर्नाटकमध्ये मोदी व शहांचा आम्ही पराभव करू’, असा पलटवार रेड्डी यांनी एका प्रचारसभेत केला.

दिल्ली पोलीसही आता मोदी-शहांच्या हातातील खेळणे झाले आहेत. ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग यांच्यानंतर मोदी दिल्ली पोलिसांचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी वापर करत आहेत. – रेवंत रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगण