Delhi Police Lathicharge Delhi High Court Hearing: नीट पेपर फुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली. या मागणीसाठी त्यांच्यावतीने सोमवारी (२० जुलै) संसदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने अमानुष लाठीचार्ज करत हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र उच्च न्यायालयाने याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

न्यायालयाला यात ओढू नका

कॉक्रेच जनता पार्टीच्या मोर्चाविरोधात दिल्ली पोलिसांनी अवाजवी बळाचा वापर केला, असा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस करिया यांच्या खंडपीठाने या वर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार देताना ‘आम्हाला यात ओढू नका’, अशी टिप्पणी व्यक्त केली.

आता या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी तत्काळ सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत बेमूदत उपोषण सुरू केले. त्यानंतर या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळू लागले. शनिवारी वांगचुक यांच्या उपोषणाचा २१ वा दिवस असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केले.

यानंतर २० जुलै झालेल्या दिल्लीतील मोर्चासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण-तरुणी एकवटले. मोठ्या संख्येने मोर्चा सुरू झाला. मात्र पोलिसांनी त्यांना वाटतेच अडवून अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शेकडो तरुण-तरुणी जखमी झाले आहेत. काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनम वांगचुक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार होणार

दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या पत्नीनेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांना इतर रुग्णालयात हलविण्यात यावे, अशी मागमी त्यांनी केली. वांगचुक यांना आता दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात शिफ्ट केले जाईल, यासाठी न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.