Delhi Police Lathicharge protest news : दिल्लीत सोमवारी संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी एका २१ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या आरएमएल रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, ती व्हेटिंलेटरवर असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एका विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित तरुणी व्हेटिंलेटरवर आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल जखमी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आरएमएल रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “येथे फक्त एकच विद्यार्थिनी दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. इतर सर्व जखमी विद्यार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वृत्तांनुसार ११० लोक जखमी झाले आहेत, परंतु आमच्याकडे अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही.”
दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील पहाटेच रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. तर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वॉड्रा यांनीही सोमवारच्या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली.
अभिजीत दिपकेंनी मागितली माफी
दरम्यान, आज सकाळीत अभिजीत दिपके यांनी आंदोलनात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्याने सर्वांची जाहीर माफी मागितली. या आंदोलनामुळे मुलांची डोकी फोडली गेली आहेत, असं म्हणत दिपके यांनी सरकारवर तोफही डागली होती.
“मी आमच्या सर्व समर्थकांची, विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण झालेल्या मुलींची माफी मागतो. आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानुष कृत्यांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करू शकलो असतो”, असं अभिजीत दिपके म्हणाले.
आम्ही तुम्हा सर्वांसाठी लढत राहू
“२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एका धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी झाला असाल आणि हा संदेश पाहत असाल, तर कृपया मला DM करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचं आहे आणि तुमची माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू”, असं अभिजीत दिपके म्हणाले.
