Delhi Police Minor Girl PM Modi Remarks: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या १५ वर्षीय युवतीविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनात युवतीने मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. याप्रकरणी युवतीवर झिरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी युवतीवर अद्याप नियमित गुन्हा दाखल केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही

नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या १५ वर्षीय युवतीने मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. याप्रकरणी नोएडा एक्सप्रेस पोलिस ठाण्यात युवतीविरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर कारवाईसाठी एफआयआर दल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, “मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा केला जात आहे या पार्श्वभूमीवर नियमित एफआयआर दाखल करण्याबाबतचा निर्णय अद्याप व्हायचा आहे”, असे दिल्ली पोलिस सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने म्हटले आहे.

नोएडात झिरो एफआयआर

जंतर मंतरवर आंदोलनात जमावाच्या प्रभावाखाली येऊन आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे सांगत युवतीने सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. तसेच, युवतीने तिची ही पहिली आणि शेवटी चूक असेल असेही स्पष्ट केले होते. युवतीविरोधात नोएडा एक्सप्रेस पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला व पुढील कारवाईसाठी एफआयआर दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. मोदींनी देखील एका व्हिडीओच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना माफ केल्याचे जाहीर केलं होतं.

दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

“नोएडा पोलिसांनी गेल्या आठवड्यात एक झिरो एफआयआर पाठवला होता, परंतु त्याचे दिल्लीत नियमित एफआयआरमध्ये रूपांतर होणे बाकी आहे. त्यामुळे एफआयआर मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे दिल्ली पोलीस सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने म्हटले आहे.

माफीच्या व्हिडीओत युवती काय म्हणाली होती?

युवतीने एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल माफी मागितली होती. “आंदोलनात जमावाच्या प्रभावाखाली येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अयोग्य भाषेचा वापर केला. याबाबत लाज वाटत आहे. ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल”, असे युवतीने म्हटले होते. तसेच, या व्हिडीओत तिने तिचे वय १५ वर्षे असल्याचे सांगितले आहे.