Delhi Police Letter CJP Protest : दिल्लीतील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नागरिकांसाठी ‘ओपन लेटर’ जारी केले आहे. ‘एक्स’वरील या पोस्टमध्ये त्यांनी “तुमचा आवाज हा तुमचा अधिकार आहे आणि तुमची सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे. गणवेशाच्या मागेही एक माणूस असतो. त्याचेही कुटुंब आणि आपली माणसे असतात. फरक फक्त गणवेशाचा आहे, माणुसकीचा नाही,” असे या पत्रात म्हटले आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारली
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी आंदोलन आयोजित केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली. संयुक्त पोलीस आयुक्त नुपूर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सहसंयोजक सौरभ दास यांनी ७ ऑक्टोबर रोजी आंदोलनासाठी परवानगी मागणारा अर्ज सादर केला होता. अर्ज उशिरा सादर करणे, यापूर्वीच्या आंदोलनात नियमांचे पालन न करणे तसेच सार्वजनिक सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेबाबतच्या चिंता ही परवानगी नाकारण्यामागील कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्लीला थांबा असणाऱ्या काही रेल्वेगाड्यांवर निर्बंध आणि दिल्ली मेट्रोच्या काही स्थानकांवरील बंदीमुळेही वाद निर्माण झाला आहे. दिल्लीला जाणाऱ्या आंदोलकांना रोखले जात असल्याचा आरोप विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केला आहे. आज सायंकाळपासून दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात येणार आहे. या घडामोडींवर आता ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला असून पंतप्रधान मोदींनी अधिकृतरित्या आणीबाणी घोषित केली असल्याचे ते म्हणाले. ‘सीजेपी’चे आशुतोष रांका यांनी गुरुवारी रात्री देशभरातून हजारो लोकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठीही सूचना
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठीही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पत्रकारांनी संबंधित मीडिया संस्थेने दिलेले वैध ओळखपत्र बरोबर ठेवावे आणि ते स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, पोलिसांनी नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर दिला आहे.
