scorecardresearch

भाजप नेत्याच्या अटकेवरून पंजाब पोलिसांना दिल्ली पोलिसांचा विरोध

भाजपचे नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये रणकंदन माजले.

  • पंजाबच्या पथकावर दिल्लीत अपहरणाचा गुन्हा
  • कुरुक्षेत्रमध्ये हरियाणा पोलिसांकडूनही घेराव 

नवी दिल्ली : भाजपचे नेते तेजिंदरपाल बग्गा यांच्या अटकेवरून गुरुवारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये रणकंदन माजले. अत्यंत नाटय़मय घडामोडींमध्ये दिल्लीतील निवासस्थानी बग्गा यांना अटक करणाऱ्या पंजाब पोलिसांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ‘अपहरणा’चा गुन्हा दाखल केला. हरियाणा पोलिसांनी बग्गा यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे बग्गा मोहालीला न जाता दिल्लीला परत आले.

दोन राजकीय पक्षांच्या संघर्षांत दिल्ली, पंजाब व हरियाणा या तीन राज्यांतील पोलीस एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र दिसले. दिल्ली व पंजाबमध्ये आपचे सरकार असून हरियाणामध्ये भाजपची सत्ता आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. हरियाणा व दिल्ली पोलिसांच्या या ‘संयुक्त कारवाई’मुळे पंजाब पोलिसांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली.

भाजपचे आक्रमक नेते तेजिंदरपाल बग्गा यांना अटक केल्यानंतर पंजाब पोलिसांचा ताफा मोहोली जिल्ह्याकडे रवाना झाला. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता हा ताफा कुरुक्षेत्रमध्ये आल्यावर हरियाणा पोलिसांनी त्यांना घेराव घातला. याविरोधात पंजाब पोलिसांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली पण, न्यायालयाने बग्गा यांना हरियाणाच्या हद्दीत ठेवण्याची विनंती नाकारली व सुनावणी शनिवापर्यंत तहकूब केली.

बग्गा यांचे वडील प्रित पाल यांनी पंजाब पोलिसांविरोधात तक्रार केल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला व द्वारका न्यायालयाकडे सर्च वॉरंट मागितले. त्याआधारे दिल्ली पोलिसांनी तातडीने कुरुक्षेत्र गाठले. कुरुक्षेत्रमधील थानेसर पोलीस ठाण्यातच पंजाब पोलिसांना रोखून धरले गेले. त्यानंतर हरियाणा पोलिसांकडून बग्गा यांना ताब्यात घेण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या टिप्पणीवर बग्गा यांनी ट्वीट केले होते. बग्गा हे केजरीवाल यांच्याविरोधात प्रक्षोभक विधाने करत असल्याच्या तक्रारीनंतर बग्गा यांच्याविरोधात पंजाबमधील मोहाली जिल्ह्यात सायबर गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी बग्गा यांना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जनकपुरीतील घरातून अटक केली. मात्र, ‘‘ही कारवाई करताना बग्गा यांना १५ ते २० पंजाब पोलिसांनी मारहाण केली, त्यांना पगडीही बांधू दिली नाही,’’ असा आरोप बग्गा यांचे वडील प्रित पाल यांनी केला. त्यानंतर बग्गा यांच्या अटकेचे आणि सुटकेचे नाटय़ घडले.

पाच वेळा नोटीस : 

पंजाब पोलिसांनी बग्गा यांना अटक करण्यापूर्वी दिल्ली पोलिसांना कळवले नसल्याचा दावा भाजपकडून केला गेला मात्र, बग्गा यांना पाच वेळा नोटीस बजावूनही ते चौकशीसाठी पंजाबला गेले नाहीत. त्यांना अटक करण्यापूर्वी पंजाब पोलिसांचा चमू जनकपूर पोलीस ठाण्यात गेला होता. बग्गा यांना अटक झाली तेव्हाही पंजाब पोलीस जनकपुरी पोलीस ठाण्यात होते, असा दावा ‘आप’चे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी, ‘‘५० पोलिसांनी बग्गा यांना अटक केली. बग्गा हे सच्चे शीख असून पंजाब पोलीस त्यांना घाबरवू शकत नाहीत’’, असा दावा ट्वीटद्वारे केला. ‘‘एका गुंडाला वाचवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांना ओलीस धरले होते’’, अशी टीका ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी केली.

न्यायालयाबाहेर भाजपची निदर्शने

द्वारका न्यायालयात पोहोचलेल्या पंजाब पोलिसांच्या चमूला भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांचा विरोध सहन करावा लागला. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यम्क्ष आदेश गुप्ता यांच्यासह नेते व कार्यकर्त्यांनी ‘आप’विरोधात तीव्र निदर्शने केली, ‘आप’च्या पक्ष कार्यालयावरही भाजपने मोर्चा काढला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi police opposes punjab police bjp leader arrest ysh

ताज्या बातम्या