Delhi Police Order Jantar Mantar controversy: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने २० जुलै रोजी संसदेवर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. ज्यात अनेक विद्यार्थी आणि आंदोलक जखमी झाले. यावेळी गणवेष नसलेले साध्या वेषातील पोलिसांनीही विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी पोलिसांसाठी नवे आदेश दिले आहेत.

द इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. जंतर-मंतरवर बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी केवळ गणवेषातच कर्तव्य बजावावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

२० जुलै रोजी निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चा थेट संसदेच्या गेटजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने केलेल्या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले. या कारवाईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात साध्या कपड्यांत असलेले काही जण तरुणांना झोडपताना दिसून येत आहेत.

तरुण-तरुणींवर अतिरिक्त बळाचा वापर करून त्यांना जखमी केल्याबद्दल पोलिसांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. अनेक सेलिब्रिटी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांच्या मारहाणीवर टीका केली. साध्या कपड्यांत असलेले पोलीस, तसेच गणवेष घातलेल्या पोलिसांनी आपल्या छातीवरील नावाची प्लेट काढून ठेवली होती. याबद्दल अनेकांनी आक्षेप व्यक्त केला आहे.

यानंतर मंगळवारी सायंकाळी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयातून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जंतर-मंतर येथे बंदोबस्तासाठी तैनात असताना साधे कपडे घालू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मोर्चा थांबविण्यासाठ बॅरिकेड्सचे तीन थर लावण्यात आले होते. पहिला अडथळा टॉल्स्टॉय मार्गावर, दुसरा संसद मार्गावर आणि तिसरा अडथळा ट्रान्सपोर्ट भवनजवळ लावण्यात आला होता. सकाळी १०.३० वाजता आंदोलकांनी टॉल्स्टॉय मार्गावरील बॅरिकेड्स तोडून संसद मार्गाकडे कूच केले. कालांतराने तेही बॅरिकेड्स तोडण्यात आले. यानंतर आंदोलक तिसऱ्या आणि शेवटच्या बॅरिकेड्सकडे वळल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला.

साधा गणवेष, नेम प्लेट लपवणे कायदेशीर आहे?

द इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी किंवा जिथे ओळख लपविण्याची गरज आहे, अशा मोहिमेदरम्यान साधा गणवेषात वावरण्याची मुभा असते. मात्र नेहमीच्या बंदोबस्तासाठी किंवा कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलिसांचे नियम आणि न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते.