दिल्लीत महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या आरोपांत अडकलेल्या एसीपी विवेक भगत यांची बढती थांबवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. विवेक भगत यांना अतिरिक्त डीसीपी हे पद देण्यात आलं होतं. मात्र ही बढती आता दिल्ली पोलिसांनी थांबवली आहे. दिल्ली पोलिसांनी या बढतीला स्थगिती दिली आहे. ३ ऑक्टोबर रोजी जंतरमंतर परिसरात आंदोलनाचे वार्तांकन करताना दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तीन महिला पत्रकारांनी केला आहे. पोलिसांनी या तिन्ही तक्रारी स्वीकारून त्या गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी पाठवल्या आहेत. तक्रारींची पडताळणी करण्यासाठी संबंधित महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत विवेक भगत यांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे.

विवेक भगत हे सध्या दिल्ली पोलीस दलात एसीपी या पदावर कार्यरत आहेत. शनिवारी म्हणजेच ३ ऑक्टोबरला जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी करण्यात आलं होतं. या प्रकरणाचं वार्तांकन करण्यासाठी ज्या महिला पत्रकार आल्या होत्या त्यातल्या एकीने एसीपी विवेक भगत यांनी तिचा विनयभंग केला असा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर आता विवेक भगत यांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे.

महिला पत्रकारांचा आरोप काय?

एका पत्रकाराच्या तक्रारीनुसार, महिला आंदोलकांना पुरुष पोलीस कर्मचारी ताब्यात घेत असल्याचे पाहून तिने तिथे महिला पोलीस कर्मचारी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला धक्का दिल्याचा तिचा आरोप आहे. दुसऱ्या पत्रकाराने आपण अशोक रोडवर आंदोलनाचे वार्तांकन करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. संबंधित आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी सुरू केली स्वतंत्र चौकशी

दिल्ली पोलिसांनी या आरोपांवर स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ३ ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीत या तक्रारी करण्यात आल्या आणि त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.