स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणी प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय साहायक बिभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी पोलिसांनी स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला होता. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा – “…तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही”; स्वाती मालिवाल प्रकरणावर अंजली दमानियांनी …

सोमवारी (१३ मे रोजी) स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. सकाळी १० वाजताच्या सुमारास या प्रकरणाची माहिती पोलीस कंट्रोल रुमला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल होत याप्रकरणी चौकशी सुरू केली होती.

दरम्यान, गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला होता. दिल्ली पोलीस स्वाती मालिवाल यांच्या निवासस्थानी ४ तासांपेक्षा जास्त वेळ होते. यावेळी स्वाती मालीवाल यांनी आपल्या तक्रारीत १३ मे रोजी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. तत्पूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार बिभव कुमार यांना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते.

स्वाती मालीवाल प्रकरणावर आपने काय म्हटलं होतं?

या प्रकरणावर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली होती. आप नेता संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणाले, “ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटायला स्वाती मालिवाल गेल्या होत्या. त्या जेव्हा केजरीवाल यांची वाट बघत होत्या तेव्हा बिभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरव्यवहार केला आणि कथित मारहाणही केली. या सगळ्या घटनेनंतर आता स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लेखी तक्रार दिली आहे. दिल्ली पोलिसांचं पथक स्वाती मालिवाल यांच्या घरी गेलं होतं तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.”