दिल्लीतील सीईसी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लैंगिक छळ झाल्याचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकारासह १७ जणांना सोमवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. या पत्रकारांसह काही पत्रकार, युट्यूबर्स आणि आंदोलकांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर रात्रभर ठिय्या देत संबंधित पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आणि कारवाईची मागणी केली होती. ताब्यात घेतलेल्या सर्वांना बसमधून दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तक्रारदार महिला पत्रकाराने पोलिस अधिकाऱ्यांना भेटून आपल्या तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात जाण्याची मागणी केली होती. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

तीन महिला पत्रकारांच्या तक्रारी

३ ऑक्टोबर रोजी जंतरमंतर परिसरात आंदोलनाचे वार्तांकन करताना दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तीन महिला पत्रकारांनी केला आहे. पोलिसांनी या तिन्ही तक्रारी स्वीकारून त्या गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी पाठवल्या आहेत. तक्रारींची पडताळणी करण्यासाठी संबंधित महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

एका पत्रकाराच्या तक्रारीनुसार, महिला आंदोलकांना पुरुष पोलीस कर्मचारी ताब्यात घेत असल्याचे पाहून तिने तिथे महिला पोलीस कर्मचारी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला धक्का दिल्याचा तिचा आरोप आहे. दुसऱ्या पत्रकाराने आपण अशोक रोडवर आंदोलनाचे वार्तांकन करत असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. संबंधित आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत.

पोलिसांनी काय म्हटले?

दिल्ली पोलिसांनी या आरोपांवर स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ३ ऑक्टोबरच्या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीत या तक्रारी करण्यात आल्या आणि त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी संसद मार्ग परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगितले. हा परिसर आंदोलनासाठी निर्धारित नसल्याने आंदोलकांना तेथून दूर जाण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी जागा सोडण्यास नकार दिल्याने ताब्यात घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ताब्यात घेताना पोलिसांकडून मारहाण किंवा गैरवर्तन झाल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळला असून, ताब्यात घेताना काही जणांनी विरोध केल्याने त्यांना पुरुष आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी बसमध्ये नेल्याचे सांगितले.

आंदोलनादरम्यान शेकडो जणांना ताब्यात

सीईसी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ३ ऑक्टोबरलाही ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या अध्यक्षा नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह १५० हून अधिक जणांना जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर तीन महिला पत्रकारांच्या तक्रारी आणि त्यानंतर एफआयआरच्या मागणीसाठी झालेला ठिय्या यामुळे दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, लैंगिक छळाच्या आरोपांबाबत अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नसून गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.