Arvind Kejriwal E20 petrol protest : E20 पेट्रोलच्या विरोधात मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढणाऱ्या आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी मार्गातच अडवले. त्यानंतर केजरीवालांसह आपचे नेते फिरोज शाह रोडवरच ठिय्या आंदोलनाला बसले. या आंदोलनात आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
E20 पेट्रोल जनतेवर लादू नका
एएनआयशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका आणि देशातील जनतेवर E20 पेट्रोल लादू नका, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली.
E20 आणि सामान्य पेट्रोलचा पर्याय द्या
काही दिवसांपूर्वी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित नॅशनल टाउन हॉल कार्यक्रमातही केजरीवाल यांनी E20 पेट्रोलचा मुद्दा उपस्थित केला होता. पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 आणि सामान्य पेट्रोल यापैकी कोणते इंधन घ्यायचे याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांनी मागणी केली होती.
केंद्र सरकारवर गंभीर आरोप
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात अमेरिकन इथेनॉल विकण्यास इच्छुक असल्याचा दावा केला होता. केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर मोदी सरकार देशातील जनतेचे ऐकण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐकत असल्याचा आरोप केला. “E20 पेट्रोलमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. पुढील पाच वर्षांत २० अब्ज डॉलर किमतीचे इथेनॉल खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. हा व्यवहार नेमका कोणाच्या फायद्यासाठी आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारचा दावा काय?
दरम्यान, केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की E20 पेट्रोलची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते किंवा वाहनाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत.
