मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनांप्रकरणी आठ दिवसांत २५ ‘एफआयआर’ दाखल झाल्या आहेत. गुरुवारी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये किरकोळ झटापट झाल्याचे वृत्त आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २ ऑक्टोबरपासून या आंदोलनांशी संबंधित गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी ‘सीईसी’ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानंतर ४ ऑक्टोबरला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आंदोलनाची हाक दिली होती.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांशी झटापटीचे आरोप

आंदोलनांशी संबंधित बहुतांश ‘एफआयआर’ या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पोलिसांशी धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा आणणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांशी संबंधित आहेत. गुरुवारी दाखल झालेल्या ‘एफआयआर’मध्ये नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ चे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप एका काश्मिरी व्यक्तीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्यानुसार मारहाणीशी संबंधित कलमे जोडली जाऊ शकतात, असे पोलिसांनी सांगितले.

राहुल गांधी, प्रियांका गांधींविरोधातही ‘एफआयआर’

बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिस अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की आणि त्यांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपांवरून राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याविरोधात किमान तीन ‘एफआयआर’ दाखल झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.

राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढण्याची तयारी

गुरुवारी विरोधी खासदारांच्या आंदोलनाचा सलग तिसरा दिवस होता. राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी राजघाट येथे महात्मा गांधींच्या स्मारकाजवळ शांततापूर्ण आंदोलन केले. ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारीही आंदोलन सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. संसद परिसरात एकत्र येऊन राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढण्याची त्यांची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या भेटीसाठी अद्याप प्रतीक्षा

काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी राष्ट्रपतींकडे २ ऑक्टोबरला विनंती करण्यात आली होती. त्यानंतर ५ ऑक्टोबरला सर्व नेत्यांची नावे पाठवून ७, ८ किंवा ९ ऑक्टोबरला भेटीसाठी वेळ मागण्यात आली.

“अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आम्ही उद्यापर्यंत प्रतीक्षा करू,” असे वेणुगोपाल म्हणाले. भेटीसाठी वेळ मिळाल्यास निवडक खासदार राष्ट्रपतींची भेट घेतील. अन्यथा राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढून तिथे आंदोलन करण्यात येईल, असे ‘इंडिया’ आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.