नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाची धग शनिवारीही कायम राहिली. ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चापूर्वी ताब्यात घेण्यात आलेले कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांची शनिवारी शांतता राखण्याच्या बंधपत्रावर सशर्त सुटका झाली. तसेच, ‘एआयएसए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांनाही शनिवारी पहाटे प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सोडून देण्यात आले.

दरम्यान, आंदोलनाची पुढील दिशा रामलीला मैदानाकडे वळण्याची शक्यता असून, काँग्रेसला तेथे आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिले आहे.

कनॉट प्लेस येथे शुक्रवारी ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चा काढण्याचे ‘सीजेपी’ने आवाहन केले होते. मात्र, पोलिसांनी दिपके यांना मोर्चा काढण्यास मनाई करणारी नोटीस बजावली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गावंडे यांच्या करोलबाग येथील घरातून दिपके तिरंगा हातात घेऊन बाहेर पडले. घराबाहेर पडल्यानंतर पाच मिनिटांत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

‘मी एकटाच आहे. तुम्ही मला का अडवत आहात?’ असा सवाल दिपके यांनी पोलिसांना केला. त्यानंतर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन निघून गेले. शुक्रवारी रात्रभर दिपके यांचा ठावठिकाणा ‘सीजेपी’च्या नेत्यांनाही माहीत नव्हता. दिपके यांना त्यांच्या वकिलांशीही संपर्क साधू दिला जात नसल्याचा आरोप ‘सीजेपी’ने केला. दिपके यांना न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले जाईल, अशी माहिती शनिवारी सकाळी पोलिसांकडून ‘सीजेपी’च्या नेत्यांना देण्यात आली. दिपके यांना दुपारी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याआधी ‘सीजेपी’चे नेते रोहन देशपांडे यांनी मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना पत्र लिहून दिपके यांच्या ठावठिकाणाची माहिती मागितली होती.

शांतता बंधपत्रावर सुटका

दिपके यांना शनिवारी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले. शांतता राखण्याच्या बंधपत्रावर स्वाक्षरी करण्याच्या अटीवर त्यांची सशर्त सुटका करण्यात आली. यापुढे शांतताभंग करणार नाही, अशी हमी त्यांना द्यावी लागली. शांतता राखण्यासंदर्भातील बंधपत्र दिपके यांनी लिहून दिल्यामुळे आता ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन कसे पुढे नेतात, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

कनॉट प्लेस येथे शुक्रवारी तिरंगा मोर्चा काढण्याचे आवाहन सीजेपीने केले होते. त्यानुसार हजारो तरुण आंदोलकांनी कनॉट प्लेस येथे गर्दी केली होती. सीजेपीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असला, तरी हा मोर्चा एकप्रकारे नेतृत्वहीन होता. यापुढील ह्य्सीजेपीह्णच्या आंदोलनाचे नेतृत्व नेमके कोण करणार आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत ‘सीजेपी’कडून सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तिरंगा मोर्चात सहभागी झालेल्या ‘एआयएसए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांच्या ठावठिकाणाबाबतही शुक्रवारी रात्री संभ्रम निर्माण झाला होता. नेहा बोरा यांना आर. के. पुरम पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगत, महिला विद्यार्थी नेत्याला मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात का ठेवण्यात आले, असा सवाल ‘एआयएसए’ ने केला होता. अखेर पोलिसांनी शनिवारी पहाटे नेहा बोरा यांची सुटका केली.

पोलीस मुख्यालयावर मोर्चा

आंदोलनादरम्यान महिला आणि पारलिंगी आंदोलकांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत ‘भाकप’ आदी डाव्या पक्षांच्या महिला संघटना आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी दिल्ली पोलीस मुख्यालयाकडे मोर्चा काढला. संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

काँग्रेसच्या सभेला मंजुरी

’काँग्रेसने रामलीला मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. त्याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.

’२५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान रामलीला मैदान उपलब्ध राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

’त्यामुळे काँग्रेसची १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर मोठी सभा होण्याची शक्यता आहे.