नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी १० आणि ११ ऑक्टोबरला निदर्शनांचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांच्या कामात अडथळे आणले, असा आरोप काही पत्रकार आणि माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या संघटनांनी केला आहे.

या निदर्शनांदरम्यान पोलिसांना ३०पेक्षा जास्त पत्रकारांना काही वेळासाठी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असा आरोप करत या पत्रकार आणि संघटनांनी देशातील माध्यम स्वातंत्र्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, ‘दिल्ली युनियन ऑफ जर्नालिस्ट्स’ने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट’ या संघटनेने म्हटले आहे की, या घटना त्रासदायक होत्या आणि भारताच्या लोकशाही पररंपरेवर कलंक होत्या. भारतीय अधिकार्‍यांनी पत्रकारांचे संरक्षण करावे आणि संबंधित अधिकार्‍यांवरील जबाबदारी निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, काही निदर्शक पोलीस असल्याचा बहाणा करून आले होते आणि पोलिसांच्या कामात अडथळे आणत होते असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. 

शनिवारी निदर्शनांचे वार्तांकन करत असताना पोलिसांनी आपल्याला मारहाण केली आणि काही वेळासाठी ताब्यात घेतले, असा आरोप ‘द कारवान’ या मासिकाचे २६ वर्षीय पत्रकार रायन थॉमस यांनी केला.

पोलीस अधिकारी निदर्शकांना ताब्यात घेत असताना मी त्यांच्या मागे जात होतो. त्यावेळी अधिकार्‍यांनी मला घेराव घातला आणि माझ्याकडे प्रेस कार्ड असतानाही त्यांनी मला ओढत नेऊन एका बसमध्ये बसवले. अधिकार्‍यांनी मला डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर मारले. माझा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला व्हिडिओ फुटेज डिलिट करण्याचे आदेश दिले.