नवी दिल्ली : शेतकरी संघटनांपासून विरोधी पक्षांपर्यंत अनेकांनी दिल्लीत आंदोलन करून केंद्र सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले. मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच आंदोलक थेट संसदेवर धडकले. संसद भवनाकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते तरुण-तरुणींनी व्यापून टाकल्याने पोलीस व निमलष्करी दलाला आंदोलकांना आवरता येत नसल्याने सुरक्षा व्यवस्था हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना वारंवार अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागत होत्या. तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते.

मोदी सरकारच्या १२ वर्षांत पहिल्यांदाच संसद भवन परिसरातील आंदोलनावेळी सुरक्षा व्यवस्था निर्नायकी दिसत होती. यापूर्वी शेतकर्‍यांचे आंदोलन झाले होते, मात्र ते दिल्लीच्या वेशीबाहेर होते. त्यापूर्वी २०१९मध्ये जंतरमंतरवर शेतकरी संघटनांनी दोन दिवस आंदोलन केले होते. मात्र कोणतेही आंदोलन इतके हिंसक झालेले नव्हते. संसदेकडे पोहोचणार्‍या संसद मार्ग, रायसीना, अशोका, रफी, राजेंद्र प्रसाद, रकाबगंज, पंत आदी सहा-सात मार्ग काही किमीपर्यंत आंदोलकांनी भरून गेले होते. संसदेच्या समोरील चौकाला लागूनच सरकारी मंत्रालये असलेले शास्त्री भवन, कृषि भवन आहे. हा सगळा परिसर तरुण आंदोलकांनी दणाणून टाकला होता.

कामापुरता मामा!

मुंबई : सोनम वांगचुक यांच्यावर टीका करणार्‍या भाजप शासनाच्या अनेक शैक्षणिक प्रयोगांच्या प्रसारासाठी वांगचुक यांच्या नावाचा वापर शासनाकडून करण्यात आला आहे. भाजप सर्मथकांकडून वांगचुक यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्न उभे करण्यात येत आहेत, तर भाजपच्या नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र, याच भाजप शासनाने केलेले शैक्षणिक प्रयोग, प्रकल्प, धोरण यांच्या प्रचारासाठी वांगचुक यांची उदाहरणे देण्यात येत होती. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे महाराष्ट्रात शिक्षण मंत्री असताना ते अधिकार्‍यांसमवेत वांगचुक यांचा लडाख येथील प्रकल्प, शाळा पाहून आले होते.

‘जय भीम’च्या घोषणा

संसदेवरील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळी सर्व थरांतील आणि वयोगटातीलही नागरिक जंतर-मंतरकडे जमा होत होते. हातात विविध संदेश लिहिलेले फलक आणि तिरंगा घेतलेले निदर्शक ‘भारत माता की जय’, ‘जय भीम’, ‘वंदे मातरम’ आणि ‘धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो’, अशा घोषणा देत होते. निदर्शकांना थांबवल्यावर ते तिथेच ठिय्या देऊन बसत होते. काही निदर्शक गणवेष परिधान करून आले होते. काहींच्या अंगावर झुरळाचे वेश होते. संसद परिसरापासून दोन किमी अंतरावर नीती आयोग भवनाजवळील ‘नॅशनल एज्युकेशन इ्स्टिटट्यूट फॉर ट्रायबल अफेअर्स’च्या इमारतीजवळ ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

दिपके, अंगमो यांच्यासंबंधी वृत्तांचे खंडन

सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली अंगमो यांच्याशी गैरवर्तन केले नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी सोमवारी केला. यासंबंधी करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले नसल्याचेही दिल्ली पोलिसांनी नमूद केले. दिपके आणि अंगमो यांना ताब्यात घेतलेले नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला असला तरी, त्या दोघांना जवळच्या केरळ हाऊस येथे नेण्यात आले, त्यानंतर त्यांनी तिथे धरणे आंदोलन सुरू ठेवले असे सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलनाचे व्यासपीठ मोडून टाकले. तसेच तो संपूर्ण परिसर ताब्यात घेतला.

आयोजकांच्या घराबाहेर पोलिसांची दडपशाही

मुंबई : सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आयोजित आंदोलन पोलिसांनी सोमवारी दडपले. डाव्या पक्षांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आयोजकांच्या घरी धाव घेऊन त्यांना नजरकैदेत ठेवले. तसेच, त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. दादर परिसरात आंदोलनासाठी दाखल झालेल्या तरुणांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

मुंबईतील चैत्यभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष यांनी वांगचुक यांच्या सर्मथनार्थ आंदोलन आयोजित केले होते. मात्र आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आयोजकांना घरात गाठले आणि त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मिलिंद रानडे यांना टिळक नगर पोलिसांनी घरी स्थानबद्ध केले. तसेच, त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात केल्याने त्यांना आंदोलनस्थळी पोहोचणे शक्य झाले नाही.  शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. राजेंद्र कोरडे हे घराबाहेरच असल्याने ते कसेबसे आंदोलनस्थळी पोहोचले.

विदर्भातही धग!

नागपूर : ‘सीजेपी’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी विदर्भात सर्वच जिल्ह्यतील प्रत्येक तालुक्यात आंदोलन झाले. नागपूर, गोंदिया, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर येथे विविध सामाजिक, राजकीय संघटनाच्या माध्यमातून सुमारे शंभर ठिकाणी झालेल्या आंदोलनात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली. विशेष म्हणजे, आंदोलनातील तरुणांचा सहभाग हा उत्स्फुर्त स्वरुपाचा होता. ते ‘शिक्षण मंत्री होश मे आओ’, ‘तानाशाही नाही चलेगी’ अशा घोषणा देत सरकार विरोधात संताप व्यक्त करीत होते.

वांगचुक यांच्या प्रकृतीत सुधारणा

सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची महत्त्वाची लक्षणे स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. वांगचुक यांच्या रक्तातील साखरेची पातळी अजूनही कमी आहे, मात्र त्यांना तोंडावाटे ‘ओआरएस’ तसेच पोटॅशियमची पूरक औषधे दिली जात असल्याने अन्य घटकांमध्ये सुधारणा दिसत आहे.

संसद परिसरात कडेकोट बंदोबस्त

संसदेच्या मुख्य द्वारापर्यंत आंदोलक येऊन धडकल्याने संसद भवनाच्या आतील तैनात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. संसदेची सर्व प्रवेशद्वारे तातडीने बंद करण्यात आली. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक असलेल्या विजय चौकातील संसदेच्या प्रवेशद्वारातून पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व मंत्री संसदेमध्ये येतात, हे प्रवेशद्वार अतिमहत्त्वाचे मानले जाते. या प्रवेशद्वारावर सुरक्षाव्यवस्था वाढण्यात आली.

‘मला मारा…’ म्हणणारा नागपूरचा युवक चर्चेत

नागपूर : आंदोलनकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला. या गोंधळात सुरक्षा कर्मचार्‍यांकडून मारहाण होत असतानाही ‘मला मारा, सर…,’ असे वारंवार म्हणणार्‍या एका युवकाची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. हा युवक नागपूरचा असून भारत बानाईत असे त्याचे नाव आहे. शीघ्र कृती दलाच्या १५ ते २० जवानांनी त्याच्यावर लाठीमार केला. ‘‘माझ्या डोक्यासह संपूर्ण शरीरावर मारहाण झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारने केलेली ही कारवाई निषेधार्ह आहे,’’ असे या युवकाने सांगितले. अखेर एका महिला पोलीस अधिकार्‍याने हस्तक्षेप करून  त्याला तेथून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला.

‘मोदी इतिहासातील सर्वात युवा-विरोधी पंतप्रधान!’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक युवा-विरोधी पंतप्रधान आहेत, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली. केंद्र सरकार केवळ युवकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले नाही तर ते त्यांच्यावरच हल्ला करत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. दिल्ली पोलिसांनी निदर्शकांना लाठीमार केल्यानंतर राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. नरेंद्र मोदी तरुणांच्या इतके विरोधात आहेत, की त्यांनी अपयशी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही घेतला नाही, असे राहुल म्हणाले. त्यांनी ‘एक्स’वर एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून निदर्शकांच्या मागण्या वैध असल्यामुळे आपला त्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. तसेच तरुणांवरील कारवाईवर टीका केली.

हजारो विद्यार्थी जंतर-मंतरवर पोहोचले आहेत आणि त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. सरकार त्यांना गप्प करण्याचा आणि मुद्दा गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे. – मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा

ही आपली मुले आहेत. ते आपल्या देशाचे भविष्य आहेत. हे संसद त्यांचे आहे. कोणा एकाची वैयक्तिक जहागिरी नाही. शैक्षिणक धोरणात समस्या आहेत, त्यामुळे त्यावर चर्चा व्हायला हवी, असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो. तुम्ही चर्चा करायला तयार नाही आणि मुलांवर अश्रुधूर सोडता, त्यांना मारता. कशासाठी? – प्रियंका गांधी, खासदार, काँग्रेस