दिल्लीच्या राणी बाग परिसरात एका प्रायव्हेट स्लीपर बसमध्ये ३० वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेने २०१२ मधील ‘निर्भया’ प्रकरणाच्या काळ्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.
११ मे रोजी घडलेल्या या थरारक घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली खरी, पण पीडितेच्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर मोठा आहे. आता पीडितेच्या पतीने आरोपींना कठोर फाशीची किंवा कडक शिक्षेची मागणी केली आहे.
रात्रभर वाट पाहिली, पण ती आलीच नाही…
पीडितेच्या पतीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या काळरात्रीचा थरार सांगितला. पीडित महिला, तिचा पती आणि त्यांच्या ४, ६ आणि ९ वर्षांच्या तीन मुली सोमवारी सुलतानपुरी येथे राहणाऱ्या भावाचे घर बदलण्यासाठी मदतीला गेले होते. रात्री पती मुलींना घेऊन घरी परतला, तर महिला तिथेच थांबली. तिच्याकडे मोबाईल नव्हता. रात्री १०:३० च्या सुमारास पतीने तिच्या भावाला फोन केला, तेव्हा ती घराबाहेर पडल्याचे समजले. पतीने रात्रभर तिची वाट पाहिली, पण ती घरी आलीच नाही. दुसऱ्या दिवशी थेट राणी बाग पोलीस ठाण्यातून तिचा फोन आला आणि पतीने तिथे धाव घेतली.
चालत्या बसमध्ये अत्याचार आणि नराधमांचे कृत्य
पीडित महिला मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते. घटनेच्या रात्री ती ई-रिक्षाने आणि नंतर पायी घरी परतत होती. सरस्वती विहार परिसरातील बसस्थानकाजवळ एक स्लीपर बस उभी होती. महिलेने तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला फक्त ‘वेळ’ विचारली. मात्र, त्या नराधमाने तिला जवळ बोलवून थेट बसच्या आत ओढले.
चालत्या बसमध्ये दोन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि बस नांगलोईच्या दिशेने पळवली. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला नांगलोई मेट्रो स्टेशनजवळ रस्त्यावर सोडून पळ काढला. या झटापटीत महिलेच्या चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
आरोपींना अटक, पोलिसांकडून तात्काळ कारवाई
महिलेला पोलीस ठाण्यात पोहोचताच तात्काळ मदत मिळाली. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली आणि न्यायदंडाधिकार्यांसमोर जबाब नोंदवला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत उमेश कुमार आणि रामेंद्र कुमार या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१) (बलात्कार) आणि ७०(१) (सामूहिक बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“माझ्या पत्नीला न्याय मिळाला पाहिजे, या नराधमांना कठोरतली कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी आर्त हाक आता तिच्या पतीने दिली आहे. या घटनेमुळे दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
