पीटीआय, न्यूयॉर्क
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाल किल्ल्याजवळील दहशतवादी हल्ला हा ‘अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनंट’ (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी निर्बंधांवर देखरेख ठेवणार्या विभागाच्या नव्या अहवालात नमूद केले आहे.
लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठा स्फोट झाला होता. त्यात १५ जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले. या संदर्भातील उल्लेख सोमवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात करण्यात आला आहे. ‘एक्यूआयएस’ला दहशतवादी संघटनात्मक रूप मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
‘आयएसआयएल’ आणि ‘अल कायदा’ या संघटनांवर लक्ष ठेवणार्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ निर्बंध समितीकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. ‘‘एक्यूआयएस’ने पुरवठायंत्रणा आणि आर्थिक जाळे उभारले आहे. विकेंद्रीत स्वरुपात ही संघटना काम करते. या संघटनेतील म्होरके विखुरलेले आहेत. नोव्हेंबर २०२५ मधील लाल किल्ल्याजवळील हल्ला याच संघटनेने केला. ‘आयएसआयएल आणि अल कायदा या संघटनांनी अनेक वर्षांपासून रासायनिक आणि जैविक शस्त्रे बनविण्यामध्ये रस दाखवला आहे. मात्र, त्यासाठी लागणारी तांत्रिक कुशलता त्यांना साध्य करता आलेली नाही. ही शस्त्रे तयार करायची माहिती दहशतवाद्यांना ऑनलाइन दिली गेली आहे. ‘आयएसआयएल-के’ने त्यात रुची दाखविली,’ असे अहवालात नमूद करणत आले आहे.
