Delhi Red Fort Blast Investigation : दिल्लीमधील बॉम्बस्फोटानंतर पोलीस व तपास यंत्रणांनी तपास करण्यास, आरोपींचा माग कढण्यास, पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी चालू आहे. दरम्यान, आता या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येऊ लागलं आहे. एका अहवालानुसार डॉ. मोहम्मद उमर व डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टवर परदेश प्रवासाच्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, पोलीस किंवा तपास यंत्रणांनी याबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
सोमवारी सायंकाळी लाल किल्ला परिसरात ज्या आय-२० कारमध्ये स्फोट झाला ती कार उमर मोहम्मद चालवत होता. उमरचे फरीदाबादमध्ये अटक केलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचं तपासात समोर आलं आहे.
दिल्ली स्फोटाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार सूत्रांनी असं सूचित केलं आहे की तपास यंत्रणा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संभाव्य तुर्की कनेक्शनची चौकशी करत आहेत. त्यांनी सांगितलं आहे की उमर व मुझम्मिल यांनी काही टेलिग्राम चॅनेल, टेलिग्राम ग्रुप जॉईन केले होते. त्यानंतर ते लगेचच तुर्कीला गेले होते. एका हँडलरने त्यांना फरीदाबाद मॉड्यूल तथा व्हाइट कॉलर मॉड्यूल संपूर्ण भारतात पसरवण्याची सूचना केली होती.
उमर व मुझम्मिल टेलिग्राम ग्रुपद्वारे ‘जैश’च्या संपर्कात होते
तपास यंत्रणांनी टेलिग्रामवरील धागेदोर तपासण्यास सुरुवात केली आहे. ज्या दोन टेलिग्राम ग्रुपद्वारे व्हाइट कॉलर मॉड्यूल तयार केलं गेलं ते दोन्ही ग्रुप पोलिसांनी शोधून काढले आहेत. तसेच इतरही काही टेलिग्राम ग्रुप्स शोधून काढले आहेत ज्याद्वारे हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात होते. यापैकी दोन प्रमुख ग्रुप जैशचा ऑपरेटिव्ह उमर बिन खट्टाब चालवतो. पोलिसांनी अथवा तपास यंत्रणांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.
दहशतवाद्यांना २६ जानेवारीला मोठा घातपात करायचा होता?
पीटीआयच्या वृत्तानुसार व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित अटक केलेल्या संशयितांपैकी एक असलेला डॉ. मुझम्मिल गनी याने या वर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसराची अनेकदा टेहळणी केली होती. पोलिसांनी त्याच्या मोबाइल डेटाचं विश्लेषण केल्यानंतर ही माहिती हाती लागली आहे. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की या दहशतवाद्यांनी २६ जानेवारी रोजी ऐतिहासिक स्मारकाला (लाल किल्ला) लक्ष्य करण्याची योजना आखली होती. त्याच कटाचा भाग म्हणून मुझम्मिल व त्याचे साथीदार जानेवारी महिन्यात सातत्याने लाल किल्ल्याची टेहळणी करत होते. मात्र, कडक बंदोबस्तामुळे त्यांना त्यांची योजना अंमलात आणता आली नाही.
