नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येऊन पोहोचताच, बुधवारी सकाळी दिल्लीतील ६ जनपथ आणि ११ जनपथ या दोन्ही निवासस्थानी शोककळा पसरली. ६ जनपथ हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे निवासस्थान, तर ११ जनपथ हे अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे निवासस्थान…

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी सुरू होणार असल्यामुळे सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणासाठी दोन्ही खासदार संसदेकडे रवाना होणार होत्या. तेवढ्यात अजित पवारांच्या निधनाचे वृत्त आले. त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार हे दोघेही ६ जनपथवर पोहोचले. तिथून सुप्रिया सुळे यांच्यासह तिघेही सव्वादहाच्या सुमारास विमानाने थेट पुण्याला रवाना झाले. दिल्लीतून रवाना होण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲपवरील स्टेटसवर ‘डिव्हास्टेटेड’… उद्ध्वस्त… अशा एका शब्दात भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुंबईत असल्याने ६ जनपथवर सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी तातडीने पक्षाच्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान दाखल झाल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदीही पोहोचल्या. त्या पाठोपाठ भाजपचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे हे सहपत्नीक आले होते. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंना अश्रू आवरत नव्हते. अजित पवारांच्या आठवणींनी लंके व्याकूळ झाले होते. अजित पवार गटाचे नेते व खासदार प्रफुल पटेल दिल्लीत होते. ते सुनेत्रा पवार, पार्थ पवार व सुप्रिया सुळे यांच्याबरोबर पुण्याला रवाना झाले.

राज्याच्या महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या निधनाचा सर्वपक्षीय नेत्यांना धक्का होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून विचारणा केल्याचे समजते.

लोकसभेत शोकप्रस्ताव आणि आदरांजली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, बुधवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनात अजित पवार यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला. अजित पवार १० व्या लोकसभेचे सन्माननीय सदस्य होते. सहा वेळा उपमुख्यमंत्री आणि आठ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड निर्माण केली होती. सार्वजनिक जीवनातील त्यांची बांधिलकी सदैव स्मरणीय राहील, असे ठरावात नमूद करण्यात आले. लोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.