Delhi Restaurant Fire updates : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आगीच्या घटना वाढत असून आजही भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. नवी दिल्लीतील मालवीय नगरमधील बेड अँड ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत चालवल्या जाणार्या हॉटेलला भीषण आग लागली होती. ही आग आता अटोक्यात आणण्यात आली आहे. तर, मृतांमध्ये अफ्रिकन देशातील विदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची दखल घेतली असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली.

दिल्ली अग्निशामक दलाला (DFS) सकाळी पावणे दहा वाजता फ्लरिश स्टे या हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांनी तळघरातून तीन जणांची सुटका केली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेहरू प्लेस अग्निशामक केंद्राचे विभागीय अधिकारी रवींदर हे स्वतः घटनास्थळी उपस्थित झाले.

मालवीय नगरचे आमदार सतीश उपाध्याय यांनी सांगितलं की, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. “आम्ही तातडीने संपूर्ण यंत्रणा सक्रिय केली. आपत्ती व्यवस्थापन संघ, आमच्या भागातील जिल्हा दंडाधिकारी, स्टेशन हाऊस ऑफिसर, उपविभागीय दंडाधिकारी आणि महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला. मी स्वतःही घटनास्थळी आलो आहे.” आगीचे नेमके कारण योग्य तपासणीनंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक नागरिकांनीही बचाव कार्यात मदत केल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिण जिल्ह्याचे एसडीएम, डीडीएमए जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, आग बहुदा रेस्टॉरंटमधूनच सुरू झाली असावी. मात्र, आमच्याकडे अजून पूर्ण तपशील आलेला नाही. चार मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि ओळखीबाबत आम्ही अधिकृत पुष्टीकरणाची वाट पाहत आहोत. याशिवाय, जखमींसह इतर ७ ते ८ लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.”

मुख्यमंत्री रेखा गुप्ता काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, “मालवीय नगरमधील भीषण आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. दिल्ली सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पीडित कुटुंबांना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत आणि साहाय्य पुरवले जात आहे. या दुःखाच्या प्रसंगी दिल्ली सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी साहाय्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मृतांच्या नातेवाईकांना मदतनिधी द्या

मालविया नगर मतदारसंघाचे माजी आमदार म्हणाले, “सकाळी ८ वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट झाला. सुरुवातीला किचनला आग लागली, नंतर ही आग वरील मजल्यापर्यंत पोहोचली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मीही प्रयत्न केले. गॅस आणि धुरामुळे अनेकांना त्रास झाला. त्यामुळे यामध्ये बाधित झालेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत मिळावी अशी मी सरकारकडे विनंती करतो.”

पंतप्रधानांनी घेतली दखल

“दिल्लीतील मालवीय नगर येथे आगीच्या घटनेत झालेली जीवितहानी दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा. प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपये दिले जातील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.