दिल्ली दंगल प्रकरणातला आरोपी आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी शर्जील इमामला दिल्लीतल्या कडकड्डूमा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने शर्जील इमामला ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत हा जामीन मंजूर केला आहे. चुलत भावाच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी त्याने अंतरिम जामीन मंजूर व्हावा अशी विनंती केली होती. ज्यानंतर आता न्यायालयाने शर्जील इमामला सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
शर्जील इमामच्या वकिलांनी काय म्हटलं?
शर्जील इमामच्या वकिलांनी न्यायालयाला ही विनंती केली होती की शर्जील च्या चुलत भावाचं लग्न आहे. त्यामुळे त्यासाठी त्याला जामीन मंजूर करा अशी याचिका दाखल केली होती. या प्रकरणातली परिस्थिती तपासून आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन कडकड्डूमा न्यायालयाने शर्जील इमामला सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या दरम्यान कोर्टाने घातलेल्या अटींचं पालन शर्जील इमामला करावं लागणार आहे. याआधी मार्च महिन्यात शर्जील इमामला त्याच्या लहान भावाच्या लग्नासाठी दहा दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.
शर्जील इमामने डिसेंबर २०१९ मध्ये केली होती प्रक्षोभक भाषणं
शर्जील इमामने १३ डिसेंबर २०१९ मध्ये दिल्लीमधील जामिया परिसरात आणि १६ डिसेंबर २०१९ मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषणं केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शर्जील इमामवर देशद्रोह आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. देशद्रोहाच्या प्रकरणात त्याला २०२४ मध्ये जामीन मंजूर केला होता. पण तो तुरुंगातच होता. आता त्याला न्यायालयाने चुलत भावाच्या लग्नासाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. शर्जील इमाम, उमर खालिद आणि इतर काही सीएए विरोधी कार्यकर्त्यांना २०२० मध्ये दिल्लीतल्या दंग्यांप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली होती. CAA आणि NRC चा विरोध करण्याचा देखावा करत दिल्लीत हिंसा भडकवण्याचं काम शर्जील इमाम आणि उमर खालिद यांनी केलं होतं. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत जी दंगल झाली त्यात ५३ जणांचा मृत्यू झाला. तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
कोण आहे शर्जील इमाम?
शर्जील इमाम हा मूळ बिहारच्या जहानाबादचा आहे. त्यानं मुंबईतील आयआयटी पवईमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. तसेच जेएनयूमध्ये पीएचडी करत होता. तर सीएएविरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात झालेल्या आंदोलनात त्याचा महत्वाचा सहभाग होता. दरम्यान, दिल्लीत २०२० साली झालेल्या दंगलप्रकरणात कट रचल्याचा शर्जिल इमामवर आरोप आहे.
