scorecardresearch

दिल्लीची दंगल ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारखी होती; उमर खालिदने रचला होता कट

आंदोलनाला धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवून कुठेही आंदोलन करण्याची योजना उमरने आखली होती

Delhi Riots Umar Khalid parallels planning riots 9/11 terror attacks
(Express photo by Prem Nath Pandey)

दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदच्या जामीन अर्जाला विरोध करताना फेब्रुवारी २०२० च्या जातीय दंगलीच्या कथित कटाची तुलना अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान उमर खालिदवर नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात सभा आयोजित करण्याचा आणि निषेधाच्या जागेवर देखरेख ठेवल्याचा आरोप केला. या आंदोलनाला धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवून कुठेही आंदोलन करण्याची योजना आखत त्याची चाचणी केली गेल्याचे अमित प्रसाद म्हणाले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या खंडपाठीसमोर उमरच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला. ९/११ घडण्यापूर्वीच त्यात सहभागी असलेले सर्वजण एका खास ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यापूर्वी महिनाभर ते आपापल्या ठिकाणी गेले. या प्रकरणातही तेच घडले आहे, असे प्रसाद म्हणाले.

“या घटनेच्या बाबतीत ९/११ चा प्रसंग अतिशय समर्पक आहे. ९/११ चा कट रचणारी व्यक्ती कधीच अमेरिकेत गेली नाही. मलेशियामध्ये भेटून हा कट रचण्यात आला. त्यावेळी व्हॉट्सअॅप चॅट्स उपलब्ध नव्हते. आज आमच्याकडे कागदपत्रे उपलब्ध आहेत की तो या गटाचा भाग होता आणि हिंसाचार घडणार होता हे दाखवण्यासाठी ते पुरेसे आहेत,” असा युक्तीवाद वकील अमित प्रसाद यांनी केला.

प्रसाद यांनी न्यायालयाला पुढे सांगितले की, २०२० च्या निषेधाचा मुद्दा सीएए किंवा राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) नव्हता. सरकारला लाजवेल आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची नोंद घेण्यासाठी हा निषेध होता.

सुनावणीच्या शेवटच्या तारखेला, सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की सर्व निषेध स्थळे मशिदींच्या जवळ असल्यामुळे निवडली गेली होती. पण याला धर्मनिरपेक्षतेचे नाव देण्यात आले होते. खालिद आणि इतर अनेकांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि दंगलीचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचा आरोप करण्यात आला. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.

दरम्यान, याआधी उमर खालिदच्या जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, सीएए विरोधी आंदोलनादरम्यान निवडलेली २५ ठिकाणे सर्व मशिदीजवळची होती असे म्हटले होते. श्री राम कॉलनी आंदोलनाची जागा प्रत्यक्षात नूरानी मशीद होती. सदर बाजार निषेधाचे ठिकाण शाही ईदगाह होते. शास्त्री पार्क निषेध स्थळ प्रत्यक्षात वाहिद जामा मशीद होती. जामिया मशीद प्रत्यक्षात गांधी पार्क निषेधाच्या ठिकाणी होती, असे पोलिसांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi riots umar khalid parallels planning riots k like us terror attacks abn