दिल्लीत पुन्हा एकदा २०१२ च्या ‘निर्भया’ प्रकरणासारखीच एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. सोमवारी रात्री वायव्य दिल्लीतील राणी बाग भागात एका ३० वर्षीय महिलेवर धावत्या बसमध्ये चालकाने आणि वाहकाने (कंडक्टर) मिळून सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असतानाच, आता या प्रकरणात एक अतिशय भावुक आणि हृदयस्पर्शी माहिती समोर आली आहे.
गंभीर जखमी झालेल्या या पीडित महिलेने रुग्णालयात दाखल होण्यास स्पष्ट नकार दिला. डॉक्टरांनी तिला तातडीने उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला होता, मात्र तिने दिलेले कारण ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. पीडिता म्हणाली, “मी जर हॉस्पिटलमध्ये भरती झाले, तर घरी माझ्या लहान मुलांना जेवण कोण बनवून देणार? घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.”
‘हिंदूस्तान टाइम्स्’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते आणि पितमपुरा भागात आपल्या कुटुंबासह राहते. तिचा पती हा क्षयरोगाचा (टीबी) रुग्ण असून तो आजारपणामुळे घरातच असतो. या जोडप्याला ८, ६ आणि ४ वर्षांच्या तीन लहान मुली आहेत. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी या महिलेवरच आहे. स्वतःवर इतका मोठा आघात झालेला असताना आणि गंभीर दुखापत झाली असतानाही, या माऊलीला रुग्णालयाच्या खाटेवर खिळण्यापेक्षा आपल्या भुकेल्या मुलांची काळजी जास्त होती.
नेमकं काय घडलं होतं?
सोमवारी रात्री काम संपवून ही महिला पायी घरी परतत होती. सरस्वती विहार भागातील बी-ब्लॉक बसस्थानकाजवळ तिला एक बस उभी असलेली दिसली. तिने तेथे उभ्या असलेल्या बस कंडक्टरला फक्त वेळ विचारली. मात्र, त्या नराधमाने तिला जवळ येण्याचा इशारा केला आणि जबरदस्तीने बसच्या आत ओढले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बस सुरू केली आणि पुढील दोन तास चालत्या बसमध्ये तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. अनेक किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आरोपींनी तिला नांगलोई मेट्रो स्टेशनजवळ रस्त्यावर सोडून दिले आणि पळ काढले.
आरोपी गजाआड, तपास सुरू
महिलेने कशाबशा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तिला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१) (बलात्कार) आणि ७०(१) (सामूहिक बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बिहार पासिंगची स्लीपर बस पोलिसांनी जप्त केली आहे. या बसच्या खिडक्यांना पडदे लावलेले होते, ज्यामुळे आत काय चालले आहे हे बाहेरून कोणालाही दिसू शकले नाही. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक उमेश आणि वाहक रामेंद्र या दोन्ही नराधमांना अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस सध्या या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
