Delhi Satya Niketan Building Collapse: दिल्लीत सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एका खासगी वसतिगृहाची पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धौला कुआन परिसरातील श्री व्यंकटेश्वर कॉलेजसमोर असलेली ही इमारत विद्यार्थी आणि इतरांसाठी ‘पेइंग गेस्ट’ सुविधा पुरवली जात होती.
जखमींना एम्स रुग्णालयात केले दाखल
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आलेल्या १० जणांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बचाव पथकांकडून उशिरा रात्रीपर्यंत बचाव आणि शोधकार्य सुरू होते. नानकपुरा गुरुद्वाराजवळ इमारत कोसळल्याची माहिती रविवारी दुपारी १.३४ च्या सुमारास पीसीआर कॉलद्वारे पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या किमान आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, दिल्ली अग्निशमन सेवा, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर संस्थांच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
पाच जणांचा मृत्यू
एम्सने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सत्य निकेतन येथील इमारत दुर्घटनेनंतर जेपीएन एपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये ११ रुग्णांना आणण्यात आले होते. त्यापैकी ५ जणांना मृत घोषित करण्यात आले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, एका रुग्णावर फ्रॅक्चर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला थरार
इमारत कोसळताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अवघ्या काही सेकंदात पूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. इमारतीचा मोठा भाग कोसळून ढिगारा सर्वत्र पसरला. काँक्रीट आणि इतर साहित्य अचानक खाली आल्यामुळे इमारतीत आणि आसपास असलेल्या लोकांना धावण्याची संधीच मिळाली नाही.
नूतनीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती
इमारतीजवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे ढिगाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. ढिगाऱ्याखाली लोक अडकल्यामुळे बचाव पथक अत्यंत खबरदारीने बचाव मोहीम राबवत आहेत.लइमारत कोसळण्याच्या कारणांचा तपास सुरू असून, इमारतीमध्ये सुरू असलेले नूतनीकरणाचे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तळघरात खोदकाम सुरू असल्याचा संशय असून, त्यामुळेच इमारतीचा पाया कमकुवत झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी दिली भेट
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दुर्घटनेनंतर घटनास्थळाला भेट दिली आणि त्यानंतर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान, दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, २९० आणि १२५(अ) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, दिल्ली महानगर पालिकेने याप्रकरणी कारवाई करताना पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
