Delhi Building Collapse : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक पाच मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी घडली होती. या घटनेनंतर दिल्लीत एकच खळबळ उडाली होती. या इमारतीमध्ये ‘पेइंग-गेस्ट’ (PG) म्हणून विद्यार्थी राहत होते. मात्र, रविवारी अचानक ही इमारत कोसळली. या घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर घटनास्थळी तात्काळ एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि पोलीलांसह सर्व बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं होतं.
एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांकडून घटनास्थळी बचावकार्य करण्यात आलं. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही इमारत कोसळण्याच्या घटनेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, आता दिल्लीतील हॉस्टेलची इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संबंधित हॉस्टेल मालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हॉस्टेल मालक हरिराम बंसल यांना पोलिसांनी राजस्थानमधील भिवाड़ी परिसरातून ताब्यात घेतलं आहे. आता दिल्ली पोलीस हरिराम बंसल यांना दिल्लाला घेऊन येत आहेत. आता हरिराम बंसल यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दिल्लीतील इमारत दुर्घटनेची मोदींनी घेतली होती दखल
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची पंतप्रधान मोदी यांनी देखील दखल घेतली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मोदींनी म्हटलं होतं की, “दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक इमारत कोसळल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू असून या दुर्घटनेत बाधित झालेल्यांना मदत केली जात आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.
नेमकी घटना काय घडली होती?
दिल्लीमधील सत्य निकेतन परिसरात रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी एक दुर्घटना घडली. सत्य निकेतन परिसरातील एक पाच मजली इमारत अचानक कोसळली आणि यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अनेकांना वाचवण्यात यश आलं. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य केलं होतं.
