दिल्लीमधील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक पाच मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
इमारत कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनीही गर्दी केली होती. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?
सत्य निकेतन परिसरात इमारत कोसळल्याच्या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ही घटना दुपारी १:३० वाजता घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर आहेत. ही पाच मजली इमारत ‘पेईंग गेस्ट’ निवासस्थान म्हणून वापरली जात होती. इमारत कोसळण्याच्या कारणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
#WATCH | Delhi: A building has collapsed near Satya Niketan in South-West Delhi. The fire department received an alert around 1:30 PM. The rescue operation is underway. More details are awaited: Delhi police pic.twitter.com/lqq8qFIUfE
— ANI (@ANI) September 6, 2026
दरम्यान, दिल्ली विद्यापीठाच्या ‘साउथ कॅम्पस’जवळ असलेला सत्य निकेतन हा निवासी परिसर आहे. या ठिकाणी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी राहतात. बचावकार्यात मदत करण्यासाठी एनएसयूआय सारख्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी देखील घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य करत आहेत.
इमारत अचानक कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. मदत आणि बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत असून काळजीपूर्वक तो ढिगारा हटवला जात आहे. अडकलेल्यांचा शोध घेणं आणि त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
